धाराशिव (प्रतिनिधी)- गॅस पाइपलाइन कनेक्शन अपडेट करण्याच्या नावाखाली एका अज्ञात सायबर भामट्याने धाराशिव येथील 66 वर्षीय महिलेची तब्बल 7 लाख 96 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. बनावट गॅस बिल अपडेट करण्यासाठी एपीके फाइल पाठवून बँक खात्यातील रक्कम लंपास करण्यात आली. याप्रकरणी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लता अनिल घुगे (वय 66, रा. वासुदेव गल्ली, बार्शी नाका, उंबरे कोठा, बोंबले हनुमान मंदिराजवळ, धाराशिव) यांच्यासोबत हा प्रकार घडला. दि. 21 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11.30 ते सायंकाळी 6.10 वाजण्याच्या दरम्यान त्या घरी असताना अज्ञात व्यक्तीने गॅस पाइपलाइन कनेक्शन अपडेट करण्याच्या नावाखाली त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर 8787587629 आणि 9343605761 या मोबाइल क्रमांकांवरून बनावट गॅस बिल अपडेट करण्यासाठी दोन एपीके फाइल पाठविण्यात आल्या.

या फाइलच्या माध्यमातून त्यांच्या बँक ऑफ इंडिया येथील खाते क्रमांक 050910110000849 मधून एकूण 7 लाख 96 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी लता घुगे यांनी दि. 22 ऑक्टोबर 2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 319(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 66(सी) आणि 66(डी) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


 
Top