तुळजापूर (प्रतिनिधी)- आई तुळजाभवानीच्या नवरात्रोत्सवात भाविकांच्या सेवेसाठी श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एनएसएस स्वयंसेवकांनी उल्लेखनीय योगदान दिले. अश्विनी व कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 25 व 26 ऑक्टोबर रोजी 80 विद्यार्थ्यांनी, त्यात 35 विद्यार्थिनींचा समावेश होता. सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सेवा बजावली.
पायी चालत आलेल्या भाविकांना पाणीवाटप करणे, दर्शनाच्या रांगा व्यवस्थित लावणे आणि भाविकांना आवश्यक माहिती देणे, अशी कामे विद्यार्थ्यांनी जबाबदारीने पार पाडली. गर्दीच्या काळात मंदिर परिसरातील व्यवस्थापनाला सहकार्य करत विद्यार्थ्यांनी सेवाभावाचा आदर्श घालून दिला.
एनएसएस विभागप्रमुख प्रा. प्रसाद सुतार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश राजनकर यांचे मार्गदर्शन, तसेच मंदिर संस्थानातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या या सेवाकार्याचे कौतुक होत आहे.
