धाराशिव (प्रतिनिधी)- दिनांक 02.10.2026 रोजी धाराशिव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पत्रकार परिषद पार पडली होती.सदर पत्रकार परिषदेत बोलताना युवासेनेचे जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांनी वगळण्यात आलेले ट्रिगरमुळे शेतकऱ्यांचे कसे नुकसान होत आहे हे सांगितले होते. ट्रिगर वगळण्यात आले नसते तर शेतकऱ्यांना या दुष्काळाच्या काळात पीकविमा कंपनी कडून 25 टक्के अग्रिम मिळाला असता. परंतु  ट्रिगरच आता अस्तित्वात नसल्यामुळे शेतकऱ्यांना अग्रिम मिळवण्यात मोठी अडचण निर्माण झाली असल्याचे ॲड. भोरे यांनी बोलून दाखवले होते. त्यामुळे राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून या विमा कंपन्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच कंपनीचे आणि सरकारचे साटंलोटं असल्याचा पुनरोच्चार त्यांनी केला होता.

अशातच दिनांक 06.10.2026 रोजी दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. सदर बैठकीत, तीन ट्रिगर काढून टाकल्याने पीक विमा कंपन्यांची सुटका झाली, मात्र शेतकऱ्यांबरोबरच सरकारही अडचणीत आल्याची गंभीर चर्चा करण्यात आली. तसेच जुन्या योजनेतील ट्रिगर लागू असते तर दुष्काळी परिस्थितीत तरी कंपन्यांकडून शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रिमपोटी मदत मिळाली असती. तसेच पीक विम्याच्या भरपाईची रक्कम निश्चित करणेही सोपे झाले असते. मात्र सुधारित योजना तयार करताना काही अधिकाऱ्यांनी त्यात खोडा घातल्याचा गंभीर आरोप सदर बैठकीत करण्यात आल्याचे वृत्त आहे.

मग जर अधिकाऱ्यांनी खोडा घातला असे जर म्हणणे असेल तर मग सरकार कोण चालवतंय अधिकारी का? असा गंभीर प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. आणि सरकार जर अधिकारी चालवत नसतील तर मग सरकारचा अधिकाऱ्यांवर वचक राहिलेला नाही असा याचा अर्थ होतो असे म्हणत युवासेनेचे जिल्हा समन्वयक ॲड संजय भोरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

सरकारला हे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचं भोरे यांनी म्हटले असून किमान आता तरी वगळण्यात आलेले ट्रिगर पुन्हा समाविष्ट करून शेतकऱ्यांना अग्रिम मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.


 
Top