तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे तब्बल 9 कोटी 32 लाख रुपये भाडे थकविणाऱ्या गोकुळ शुगर इंडस्ट्रीजला शासनाने दणका दिला आहे. गोकुळ शुगर, तुळजाभवानी साखर कारखाना आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यातील त्रिपक्षीय भाडेकरार अखेर शासनाने रद्द केला आहे. जून 2026 अखेर व्याजासह ही थकीत भाड्याची रक्कम 9 कोटी 32 लाख रुपयांवर पोहोचली आहे.
गोकुळ शुगरने मागील तीन वर्षांपासून कारखान्याचे भाडे अदा केले नसल्याने तुळजाभवानी कारखाना प्रशासनाने करारातील अटींच्या उल्लंघनाबाबत गोकुळ शुगरला नोटीस बजावली होती. पंधरा दिवसांत थकीत रक्कम जमा न केल्यास भाडेकरार रद्द करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा या नोटीसमधून देण्यात आला होता. सदर नोटीस साखर आयुक्तांनाही पाठविण्यात आली होती. यानंतर 25 ऑगस्ट 2026 रोजी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत तुळजाभवानी साखर कारखान्याचा त्रिपक्षीय भाडेकरार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, या बैठकीस गोकुळ शुगरचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. कामगार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून कारखाना पुढे नव्याने भाडेतत्त्वावर देण्याचे निर्देश शासनाने दिले.
गोकुळ शुगरकडील थकीत भाडे तसेच इतर येणी वसूल करण्यासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे (एनसीएलटी) मागणी करून वसुलीची कार्यवाही करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. तसेच कामगार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गोकुळ शुगरकडील देणी वसूल करण्यासाठीही आवश्यक कार्यवाही करण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. तुळजाभवानी साखर कारखाना 2021 ते 2036 या 16 वर्षांच्या कालावधीसाठी गोकुळ शुगर इंडस्ट्रीजला भाडेतत्त्वावर देण्यात आला होता. गोकुळ शुगरने 2021-22, 2022-23, 2023-24 आणि 2025-26 असे चार गाळप हंगाम घेतले. मात्र, 2024-25 मध्ये तांत्रिक अडचणींमुळे कारखाना बंद राहिला. भाडेकरारातील अटींचे पालन न झाल्याने आणि मोठ्या प्रमाणात भाडे थकीत राहिल्याने अखेर शासनाला करार रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
नव्याने टेंडर काढणार
शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून कारखाना पुढे भाडेतत्त्वावर देण्याचे आदेश झाले आहेत. सध्या कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत,” अशी माहिती कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक विकास भोसले यांनी दिली. बैठकीस सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, सोलापूर प्रादेशिक साखर उपसंचालक नानासाहेब रुपनवर, कारखान्याचे अवसायक दत्ता मोरे आदी उपस्थित होते.