तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी सुरू असतानाच नवरात्रोत्सवाच्या काळात बनावट दारूची विक्री होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी पुढे आली आहे. लाखो भाविक तुळजापूरकडे येत असल्याने या गर्दीचा गैरफायदा घेऊन अवैध दारू विक्री करणाऱ्या प्रवृत्तींवर कडक नजर ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

शारदीय नवरात्रोत्सवापासून अश्विनी पौर्णिमेपर्यंत तुळजापूरमध्ये मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. कर्नाटक, सोलापूर, लातूर, धाराशिव तसेच अन्य भागांतून भाविक पायी, एसटी बस, खासगी वाहनांसह विविध मार्गांनी तुळजापूरकडे येतात. या काळात महामार्ग तसेच शहराच्या प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

याच गर्दीचा फायदा काही समाजकंटकांकडून घेतला जात असल्याची चर्चा आहे. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत तुळजापूरच्या आजूबाजूच्या भागातून अवैध व बनावट दारू आणून तिची विक्री केली जात असल्याचे तक्रारी समजते  या दारू विक्रीतून कोट्यावधी रुपयाची उलाढाल ही होत असल्याचे वृत्त आहे  या दाव्यांची अधिकृतपणे पुष्टी होणे आवश्यक आहे.


महामार्गांवर विशेष तपासणीची गरज

तुळजापूरकडे येणाऱ्या प्रमुख महामार्गांवर आणि प्रवेशमार्गांवर अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलिसांनी संयुक्तपणे विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. विशेषतः नवरात्रोत्सवाच्या गर्दीच्या काळात संशयास्पद हवेतील विकली जाणाऱ्या दारू साठे हॉटेल बार दुकाने  वाहने, अवैध साठे आणि परवानगीशिवाय होणाऱ्या विक्रीवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.

बनावट किंवा निकृष्ट दर्जाची दारू मानवी आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकते. त्यामुळे भाविकांच्या जीविताशी संबंधित कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाईला प्राधान्य द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


‌‘गुप्त' यंत्रणेद्वारे कारवाईची मागणी

नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वीच संबंधित विभागांनी शहर आणि तालुक्यातील संभाव्य विक्री केंद्रे, साठवणुकीची ठिकाणे आणि तुळजापूरकडे येणारे प्रमुख मार्ग यांची माहिती घेऊन स्वतंत्र पथके कार्यान्वित करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. विशेषतः अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित यंत्रणेला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


वर्षानुवर्षे सुरू असल्याची चर्चा

नवरात्रोत्सवाच्या काळात तुळजापूर परिसरात बाहेरील भागातून मोठ्या प्रमाणात अवैध दारू येत असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून होत आहे. मात्र, या संदर्भात ठोस कारवाई आणि अधिकृत आकडेवारी समोर येणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने या तक्रारींची वस्तुनिष्ठ पडताळणी करून अवैध दारू विक्रीचे जाळे असल्यास त्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आहे.


पकडल्यास कठोर कारवाई करा

नवरात्रोत्सवाच्या काळात लाखो भाविक तुळजापूरमध्ये येत असताना त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या बनावट दारूच्या विक्रीला थारा मिळता कामा नये. अवैध साठा किंवा बनावट दारू आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन अवैध धंदे फोफावू नयेत, यासाठी नवरात्रोत्सवापूर्वीच प्रशासनाने कडक प्रतिबंधात्मक मोहीम उघडावी. तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज राहणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.


 
Top