धाराशिव (प्रतिनिधी)-  गावातील नागरिकाला एखाद्या शासकीय सेवेसाठी रोजगार आणि रोजचे काम सोडून तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची वेळ येऊ नये.त्याचे काम गावातच झाले पाहिजे आणि आपले सरकार' सेवा केंद्राच्या माध्यमातून त्याला दर्जेदार,सुलभ आणि वेळेत सेवा मिळाली पाहिजे,असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ.किरण जाधव यांनी केले. 

दि. 6 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा घेताना डॉ.श्री.जाधव बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

नागरिकांसाठी नगरपालिका क्षेत्रातील ‌‘आपले सरकार' सेवा केंद्रे नगर पालिका प्रशासनाने तातडीने सक्रियपणे कार्यान्वित करावीत.जानेवारी ते डिसेंबर या कालावधीतील कामगिरीच्या आधारे महसूल,ग्रामविकास आणि नगरपालिका क्षेत्रातील ‌‘आपले सरकार' केंद्रांची उत्कृष्ट केंद्र म्हणून निवड केली जाणार असून,या उपक्रमात धाराशिव जिल्हा निश्चितच चांगली कामगिरी करेल,असा विश्वासही डॉ. जाधव यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार म्हणाले की, जिल्ह्यात तहसील कार्यालयांच्या ठिकाणी नव्याने आदर्श ‌‘आपले सरकार' सेवा केंद्रे उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या केंद्रांमध्ये नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्य आयुक्त कार्यालयाकडून या सेवांचा दर महिन्याला नियमित आढावा घेण्यात येतो. बैठकीचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांनी केले.

 
Top