तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात  सोमवारी अश्विनीकोजागरी पौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त यंदा साकारण्यात आलेली भव्य पुष्पआरास पुणे येथील तुळजाभवानी मातेचे निस्सीम भक्त असलेल्या आर. आर. किराड समूहाच्या वतीने अर्पण करण्यात आली आहे. समूहाच्या वतीने सलग अकराव्या वर्षी मातेच्या चरणी ही विशेष सजावटसेवा अर्पण करण्यात आली. 

यंदाच्या पुष्पआरासेला ‌‘आदि पराशक्ती' हा विशेष आध्यात्मिक भावार्थ देण्यात आला आहे. ‌‘आदि पराशक्ती' म्हणजे समस्त शक्तींचे मूळ असलेली, सर्वोच्च, अनंत आणि विश्वाला चेतना प्रदान करणारी परम दिव्य मातृशक्ती. सृष्टीच्या निर्मितीपासून ते तिच्या संचालनापर्यंत सर्वत्र कार्यरत असलेल्या आदिशक्तीचे महात्म्य या आरासेच्या माध्यमातून कलात्मक आणि भक्तिमय स्वरूपात साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आर. आर. किराड समूहाचे व्यवस्थापकीय संचालक नरेश किराड म्हणाले, आदि पराशक्ती म्हणजे जिच्यापासून सर्व शक्तींचा उगम होतो आणि जिच्या शक्तीने संपूर्ण विश्व कार्यरत राहते, अशी परम दिव्य मातृशक्ती. श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनातून आम्हाला ऊर्जा, आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळते. मातेच्या चरणी सेवा अर्पण करण्याची संधी मिळणे, ही आमच्यासाठी अत्यंत भाग्याची आणि अभिमानाची बाब आहे. यंदा सलग अकराव्या वर्षी ही सेवा अर्पण करताना आम्ही ‌‘आदि पराशक्ती' या संकल्पनेतून मातेच्या अनंत शक्तीचे महात्म्य व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाची ही सेवा आम्ही दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या कल्याणासाठी समर्पित करीत आहोत. मातेच्या कृपेने राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्व जनतेला सुख, समृद्धी व सुजलाम-सुफलाम भवितव्य लाभो, ही प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.

 
Top