धाराशिव (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील पारा येथील डॉ. सोनाली बालाजी भराटे यांनी एम.डी. मायक्रोबायोलॉजीच्या अंतिम परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवून यश संपादन केले.
डॉ. सोनाली यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मुरूड येथे झाले. दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवून त्यांनी लातूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर लातूर येथील शाहू महाविद्यालयातून त्यांनी अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथून एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे एम.डी.चे उच्च शिक्षण घेतले.
एम.डी.च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे त्यांची सोलापूर येथे वैद्यकीय अधिकारी, गट-अ या पदावर निवड झाली. विशेष म्हणजे, अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून त्यांची दोन वर्ग-1 आणि एका वर्ग-2 पदावर निवड झाल्याची माहिती आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी यांसह अन्य शासकीय पदांसाठीही त्यांनी यश मिळविले आहे. डॉ. सोनाली या धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. बालाजी भराटे यांच्या पत्नी आहेत. रुग्णसेवेबरोबरच साथीचे आणि संसर्गजन्य आजार यांवर उच्च शिक्षण घेऊन संशोधन करण्याचा मानस असल्याचे डॉ. सोनाली देशमुख-भराटे यांनी सांगितले.
