धाराशिव  (प्रतिनिधी)- मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून आपल्या संस्कृतीची,परंपरेची,इतिहासाची आणि अस्मितेची ओळख आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीपासून संत तुकारामांच्या अभंगांपर्यंत आणि प्राचीन गाथासप्तशतीपासून आधुनिक साहित्यापर्यंत मराठी भाषेने आपल्या समृद्ध साहित्यपरंपरेचा ठसा उमटविला आहे.या भाषेचा अभिजात वारसा जतन करण्याबरोबरच तिच्या संवर्धनासाठी विशेषतः तरुण पिढीने पुढाकार घेण्याची गरज असल्याचा सूर अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवर साहित्यिकांच्या विचारमंथनातून उमटला.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव,कै.शकुंतला देशमुख प्रशाला, अनसुर्डा आणि संत गोरोबा काका वाचनालय,अनसुर्डा,ता.जि.धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह 2026 उत्साहात साजरा करण्यात आला.मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास,तिची साहित्यिक समृद्धी, सांस्कृतिक महत्त्व आणि संवर्धनाची आवश्यकता याविषयी या कार्यक्रमात मान्यवरांनी विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.गजानन चौगुले यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व.ग.सूर्यवंशी,कै. शकुंतला देशमुख प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर सूर्यवंशी,साहित्यिक सुनीता गुंजाळ-कवडे आणि ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास व पुरातत्त्व संशोधक युवराज नळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मराठी भाषेची प्रगल्भता आणि सर्वसमावेशकता अधोरेखित करताना उद्घाटक ॲड.गजानन चौगुले यांनी संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा आणि संत तुकाराम महाराजांच्या गाथेचा संदर्भ दिला. संतसाहित्याच्या विविध उदाहरणांतून त्यांनी मराठी भाषेचे सौंदर्य,विचारांची खोली आणि अभिव्यक्तीची ताकद उलगडून दाखविली.जगातील इतर भाषांचेही महत्त्व आहे; मात्र मराठी भाषेला लाभलेली समृद्ध संतपरंपरा, वैचारिक अधिष्ठान आणि सर्वसमावेशकता तिला विशेष उंचीवर घेऊन जाते,असे त्यांनी सांगितले.त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या विवेचनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व. ग. सूर्यवंशी यांनीही अभिजात मराठी भाषेच्या महत्त्वाविषयी आपले विचार व्यक्त केले.

ह.भ.प.ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ‌‘माझा मराठाचि बोलु कौतुके,परि अमृतातेही पैजा जिंके' या प्रसिद्ध ओवीचा संदर्भ देत मराठी भाषेचे माधुर्य विशद केले. ज्ञानोबारायांनी आपल्या ओवीतून मराठी भाषेच्या गोडव्याची तुलना अमृताशी केली आहे. मराठी भाषेतील शब्दसंपदा,तिचे विविध पैलू आणि विचार व्यक्त करण्याची क्षमता अत्यंत समृद्ध आहे.मराठी ही केवळ बोलण्यापुरती मर्यादित नसून ती माणसाच्या भावना, संस्कार आणि जीवनमूल्यांना अभिव्यक्त करणारी भाषा असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषेच्या विविध अंगांवर त्यांनी सविस्तर विचार मांडले. साहित्यिक सुनीता गुंजाळ-कवडे यांनी मराठी भाषेचे मातृत्वाशी नाते जोडत उपस्थितांच्या मनाला भावणारे विचार मांडले.मराठी भाषा ही आईप्रमाणे मायेची ऊब देणारी आहे.तिचा प्रवाह नदीसारखा अखंड वाहणारा असून या प्रवाहातून अनेक पिढ्यांचे संस्कार,विचार आणि सांस्कृतिक मूल्ये पुढे जात असतात. त्यामुळे मराठी भाषेचा गौरव करण्याबरोबरच तिचे जतन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ साहित्यिक,इतिहास व पुरातत्त्व संशोधक युवराज नळे यांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जामागील ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट केले.एखाद्या भाषेची प्राचीनता,समृद्ध साहित्यपरंपरा आणि ऐतिहासिक पुरावे यांना अभिजात भाषेचा दर्जा निश्चित करताना विशेष महत्त्व असते.सुमारे दोन हजार ते अडीच हजार वर्षांची प्राचीनता असलेल्या भाषांच्या संदर्भात अभिजात दर्जाचे निकष विचारात घेतले जातात,असे त्यांनी सांगितले. सातवाहन राजहल यांनी सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्री प्राकृत भाषेत रचलेला ‌‘गाथासप्तशती' हा ग्रंथ मराठीच्या प्राचीन भाषिक परंपरेचा महत्त्वपूर्ण पुरावा असल्याचे त्यांनी नमूद केले.मराठी भाषेच्या अभिजात दर्जामागील ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि साहित्यिक वारसा त्यांनी उपस्थितांसमोर उलगडून दाखविला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अभिजात भाषेचे महत्त्व विशद केले.अभिजात भाषा म्हणजे अत्यंत प्राचीन आणि श्रेष्ठ साहित्यपरंपरा लाभलेली भाषा होय.भाषा ही कोणत्याही समाजाच्या अस्तित्वाचा आणि सांस्कृतिक अस्मितेचा मूलभूत आधार असते. त्यामुळे भाषेचे जतन म्हणजे त्या समाजाच्या संस्कृतीचे जतन होय,असे त्यांनी सांगितले.

भाषा मरता देशही मरतो,संस्कृतीचाही दिवा विझे' या कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्तींचा संदर्भ देत त्यांनी मातृभाषेच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. जगातील इतर भाषा अवश्य शिकाव्यात,त्या भाषांमधील ज्ञान आत्मसात करावे; मात्र हे करताना आपल्या मायमराठीची उपेक्षा होता कामा नये.एखादी भाषा नष्ट झाली,तर त्या भाषेशी जोडलेली संस्कृती,परंपरा आणि समाजाची अस्मिताही धोक्यात येते.म्हणून मराठी भाषा जिवंत आणि समृद्ध ठेवण्यासाठी तिचा दैनंदिन व्यवहारात अधिकाधिक वापर झाला पाहिजे.विशेषतः तरुणांनी मराठी भाषेत लेखन करावे, साहित्यनिर्मितीकडे वळावे आणि आपल्या भाषेचा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला ॲड.पल्लवी वाघमारे, ह.भ.प.प्रतीक ज्ञानेश्वर सूर्यवंशी,धुत्ता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक उद्धव जाधव,लक्ष्मण भानवसे,तांत्रिक सहाय्यक प्रफुल्लचंद्र गोविंद राठोड,शशिकांत बारटक्के,आदेश राजगुरू,आकाश चव्हाण,ओंकार गव्हाणे यांच्यासह स्पर्धा परीक्षा विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे यांनी केले. सूत्रसंचालन रजनी रावळे यांनी केले, ग्रंथालय निरीक्षक शिवशंकर कटाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून मराठी भाषेचा प्राचीन इतिहास, संतसाहित्याची समृद्ध परंपरा,भाषेचे माधुर्य आणि तिच्या संवर्धनाची गरज अधोरेखित झाली.मराठी भाषेचा अभिमान केवळ शब्दांतून व्यक्त न करता वाचन,लेखन आणि दैनंदिन व्यवहारातून तिचे संवर्धन करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.


 
Top