धाराशिव (प्रतिनिधी)- पुणे येथे आयोजित होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव येथे 29 नोव्हेंबर 2026 रोजी नांदी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली साहित्य भारती, जिल्हा शाखा धाराशिव यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील राहणार आहेत अशी माहिती अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती चे देवगिरी प्रांत संघटन मंत्री तथा संमेलनाचे निमंत्रक युवराज नळे, साहित्य भारती जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे, कार्यवाह सुनिता गुंजाळ कवडे आणि जिल्हा मंत्री प्रा डॉ कृष्णा तेरकर यांनी दिली आहे.

या संमेलनात धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, शेतीसमोरील आव्हाने, शेतकरी आत्महत्यांचे प्रश्न आणि ग्रामीण जीवनातील सामाजिक-आर्थिक समस्यांवर साहित्याच्या माध्यमातून विचारमंथन करण्यात येणार आहे. साहित्याच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून जनजागृती करण्याचा या संमेलनाचा प्रयत्न आहे.पुणे येथे होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून राज्यभरात आयोजित करण्यात येणाऱ्या 99 साहित्यिक उपक्रमांमध्ये धाराशिवच्या नांदी साहित्य संमेलनाचा समावेश आहे. या संमेलनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत आणि साहित्यप्रेमींना एकत्र आणून साहित्य आणि सामाजिक वास्तव यांचा अनुबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.धाराशिव जिल्हा सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. पाणीटंचाई, शेतीतील अनिश्चितता आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर या संमेलनाला सामाजिक संवेदनशीलतेची जोड देण्यात येणार आहे. संमेलनाचे आयोजन साधेपणाने करण्यावर भर देण्यात येणार असून, जिल्ह्यातील वास्तव परिस्थिती आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवण्यात येणार असल्याची माहितीही  संयोजकांनी दिली असून लवकरच स्वागताध्यक्ष आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत नांदी संमेलनाच्या नियोजनासंदर्भात व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नांदी संमेलन निमंत्रक युवराज नळे यांनी सांगितले आहे.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top