तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील दुसऱ्या माळेनिमित्त सोमवारी (दि. 12 ऑक्टोबर) तुळजापुरातील श्री तुळजाभवानी मंदिरात धार्मिक वातावरणात देवीचे नित्योपचार व पूजा विधी पार पडले. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली असून, ‌‘आई राजा उदे उदे', ‌‘बोल भवानी की जय'च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.

नवरात्र महोत्सवानिमित्त एका देवीभक्ताने श्री तुळजाभवानी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली होती. विविध रंगांच्या फुलांनी सजलेले मंदिर आणि फुलांच्या वर्षावाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. देवीच्या दर्शनानंतर मंदिरातील मनमोहक फुलांची सजावट पाहून भाविक भारावून गेले. भक्तिभावाने नतमस्तक होत अनेक भाविकांनी मातेच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली. शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक तुळजापुरात दाखल होत आहेत. दुसऱ्या माळेच्या दिवशीही दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. मंदिर परिसरात धार्मिक उत्साह आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.

दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवारी रात्री श्री तुळजाभवानी मातेच्या उत्सवमूर्तीचा पारंपरिक छबिना हत्ती वाहनावर काढण्यात आला होता. यावेळी नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद गंगणे, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, लेखाधिकारी संतोष भेंकी, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकारी, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, यांच्यासह श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे कर्मचारी, पुजारी व भाविक उपस्थित होते. विविध धार्मिक विधी, पूजाअर्चा आणि पारंपरिक सोहळ्यांमुळे तुळजापुरातील नवरात्रोत्सवाची भक्तिमय परंपरा अधिकच उजळून निघत आहे.


सुरक्षा रक्षकांचा अतिरेक

घटस्थापने दिवशी प्रिंट मिडियाचे पत्रकार वार्ताकंन करण्यासाठी थांबले असता सुरक्षा रक्षकाने तुमच्याकडे कॅमेरा कुठे आहे असे म्हणत काही पत्रकारांना धक्काबुक्की केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील नानज येथील अनुसिंह राजपूत यांनी दरवर्षीप्रमाणे तुळजाभवानी मंदिरामधून ज्योत पेटवून घेण्यासाठी प्रवेश मागितला. त्यावेळी काही सुरक्षा रक्षकांनी राजपूत यांना पैशाची मागणी केली. त्यानंतर राजपूत यांनी संबंधित सुरक्षा रक्षक यांच्यात बाचाबाची झाली असता राजपूत यांना येथील एका कार्यालयात कोंडून मारहाण केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर राजपूत यांनी तुळजापूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता ते पोलिस बाहेर गावचे असतात असे सांगितले. राजपूत यांनी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, विधानसभेचे सभापती राम शिंदे, खासदार ओमराजे निंबाळकर यांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर यंत्रणेने कारवाई केली असल्याचे राजपूत यांनी सांगितले. 

 
Top