भूम (प्रतिनिधी)- भूम शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील हजारो नागरिकांच्या आरोग्याचा आधार असलेल्या ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे तसेच बंद व अपुऱ्या वैद्यकीय सुविधांबाबत भूम शहरातील पदाधिकारी व नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात हृदयरोगासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून 24 तास अतिदक्षता विभाग सुरू करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक प्राथमिक उपचार व सुविधा वेळेवर उपलब्ध न झाल्याने गंभीर रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, तंत्रज्ञ व इतर आवश्यक रिक्त पदे तातडीने भरावीत, एक्स-रे सुविधा नियमितपणे सुरू ठेवावी, विविध आजारांसाठी आवश्यक रक्त तपासण्या उपलब्ध करून द्याव्यात, गंभीर रुग्णांसाठी आवश्यक मनुष्यबळ व उपकरणांसह सुविधा सुरू करावी आणि गरोदर महिलांसाठी सोनोग्राफीची सुविधा नियमित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील बंद असलेल्या इतर अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा तात्काळ सुरू कराव्यात. कोणती पदे रिक्त आहेत व कोणत्या सुविधा बंद आहेत, याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे तातडीने प्रस्ताव पाठवून त्याची लेखी माहिती द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
साध्या तपासण्या व उपचारांसाठीही रुग्णांना खासगी रुग्णालये किंवा इतर शहरांकडे जावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधा सक्षम करणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी धाराशिव, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपविभागीय अधिकारी भूम आणि तहसीलदार भूम यांना देण्यात आल्या आहेत. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास ग्रामीण रुग्णालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा भूम शहर पदाधिकारी व रहिवाशांनी दिला आहे. यावेळी नगर परिषद बांधकाम सभापती, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख अनिल दादा शेंडगे, जेष्ठ नेते दिलीप शाळू महाराज, शहराध्यक्ष ऍड प्रकाश आकरे, नगरसेवक विठ्ठल बागडे, माजी नायब तहसीलदार हरीशचंद्र पवार यांनी निवेदन दिले.