धाराशिव (प्रतिनिधी)- पुस्तके केवळ ज्ञान देत नाहीत,तर माणसाचे व्यक्तिमत्त्व घडवतात. जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद देतात आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणाही निर्माण करतात.माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे संपूर्ण जीवन हे वाचन,ज्ञानसाधना आणि अखंड परिश्रमाचे प्रेरणादायी उदाहरण आहे.विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री केली,तर ते केवळ परीक्षेतच यशस्वी होणार नाहीत, तर जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची दृष्टीही त्यांना प्राप्त होईल,असे प्रतिपादन व्यंकटेश महाजन महाविद्यालय प्राचार्य डॉ.प्रशांत चौधरी यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ऑक्टोबर रोजी आयोजित 'वाचन प्रेरणा दिन' कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी ते बोलत होते. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने त्यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करणे,वाचनाची आवड वृद्धिंगत करणे आणि नव्या पिढीमध्ये पुस्तकांविषयी आत्मीयता निर्माण करणे,या उद्देशाने शासनस्तरावर या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.प्रशांत चौधरी, ज्येष्ठ साहित्यिक,इतिहास व पुरातत्त्व संशोधक युवराज नळे,जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे,प्रा.डॉ.अरविंद हंगरगेकर, प्रा.अशोक भोंग,माणिक इंगळे,साहित्यिक रजनी रावळे आणि उज्वला शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास व पुरातत्त्व संशोधक तथा साहित्य भारतीचे देवगिरी प्रांत संघटन मंत्री युवराज नळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी व्यंकटेश महाजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत चौधरी होते. या निमित्ताने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे जीवन आणि वाचनाचे महत्त्व या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.या परिसंवादात रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या मराठी विभागातील प्रा.डॉ.अरविंद हंगरगेकर,साहित्यिक रजनी रावळे आणि साहित्यिक उज्वला शिंदे यांनी सहभाग घेतला.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.प्रशांत चौधरी म्हणाले की,पुस्तकांच्या माध्यमातून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविणाऱ्या आणि आपल्या विचारांनी देशातील अनेक पिढ्यांना घडविणाऱ्या डॉ.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी होत आहे,ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.डॉ.कलाम यांचे जीवन आपल्याला शिकवते की,मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती प्रत्यक्षात साकार करण्यासाठी ज्ञान,वाचन आणि सातत्याने शिकण्याची वृत्ती आवश्यक असते. वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या विचारांना व्यापकता मिळते.पुस्तकांशी मैत्री करणारा विद्यार्थी केवळ परीक्षेपुरता मर्यादित राहत नाही,तर जीवनातील प्रत्येक प्रसंगाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यास शिकतो.
परिसंवादात मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.अरविंद हंगरगेकर यांनी वाचनाचे मानसिक आणि भावनिक आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व विशद केले.ते म्हणाले की,एकदा वाचनाची सवय लागली की,माणूस मनावरील ताणतणाव कमी करण्यासाठी पुस्तकांच्या सहवासात रमू लागतो.पुस्तके माणसाच्या मनाला आधार देतात.मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्तीला धीर देण्याचे कामही चांगले साहित्य करते. निराशेच्या गर्तेत अडकलेल्या व्यक्तीला सकारात्मक विचारांची दिशा मिळून आत्महत्या किंवा हत्या यांसारख्या टोकाच्या कृत्यांपासून परावृत्त होण्यास मदत होऊ शकते.त्यामुळे वाचन ही केवळ ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया नसून मनाला उभारी देणारी आणि जीवनाला योग्य दिशा दाखविणारी सवय असल्याचे त्यांनी सांगितले.
साहित्यिक उज्वला शिंदे यांनी वाचनातून घडणाऱ्या आत्मपरिवर्तनाचे महत्त्व अधोरेखित केले.त्या म्हणाल्या की, वाचनाचा प्रवास हा केवळ पुस्तकवाचनापुरता मर्यादित न राहता आत्मवाचनापर्यंत पोहोचला पाहिजे. वाचनातून स्वतःच्या विचारांचे आणि व्यक्तिमत्त्वाचे परीक्षण झाले पाहिजे. त्यातून आत्मपरिवर्तन घडले पाहिजे आणि या आत्मपरिवर्तनातून समाजपरिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे.वाचनातून आत्मपरिवर्तन आणि आत्मपरिवर्तनातून समाजपरिवर्तन घडवून आणणे,म्हणजेच खऱ्या अर्थाने वाचन सार्थकी लागणे होय.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक तथा साहित्य भारतीचे देवगिरी प्रांत संघटन मंत्री युवराज नळे आणि साहित्यिक रजनी रावळे यांनीही समयोचित विचार व्यक्त केले. त्यांनी वाचनसंस्कृतीचे महत्त्व आणि नव्या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक प्रा.डॉ.कृष्णा तेरकर यांनी केले तर प्रफुल्लचंद्र गोविंद राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमाला ग्रंथालय निरीक्षक शिवशंकर कटाळे,प्रसाद शिरसे, स्पर्धा परीक्षा विभागातील विद्यार्थी- विद्यार्थिनी तसेच वाचकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या विचारांचा जागर करत वाचनातून ज्ञानसमृद्ध,विचारशील आणि संवेदनशील समाज घडविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
