धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मत वाचवा, देश वाचवा' अभियानांतर्गत मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील मतदार यादीतील फेरबदल व कथित अनियमिततेच्या निषेधार्थ धाराशिव तहसील कार्यालयासमोर धाराशिव शहर काँग्रेस कमिटी व धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण भारतभरामध्ये मत वाचवा देश वाचवा अंतर्गत अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. यावेळी आंदोलकांनी ‘मत वाचवा, देश वाचवा', ‘वोट चोर, गद्दी चोर' अशा घोषणा देत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांच्या मतदानाच्या अधिकाराच्या संरक्षणाची मागणी केली. घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला. आंदोलनानंतर धाराशिव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील मतदार यादीतील फेरबदल व कथित अनियमिततेची स्वतंत्र, निष्पक्ष, पारदर्शक व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, प्रशांत पाटील, विनोद वीर, धनंजय राऊत, शीला उंबरे, खलील सय्यद, अजित शेळके, अग्निवेश शिंदे, महबूब पटेल, अजहर पठाण, शिवाजी गायकवाड, सरफराज काजी, चंद्रकांत जाधव यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदाराचा अधिकार सुरक्षित राहणे आवश्यक आहे, असा निर्धार यावेळी काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
