छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)- विधान परिषदेच्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील हे 18 हजार 124 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना 85 हजार 876 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांना 67 हजार 752 मते मिळाली. पसंतीक्रमानुसार 39 उमेदवारांची वगळणी व मतहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतमोजणीत डॉ. पाटील यांनी सर्वाधिक मते मिळवली. भारत निवडणूक आयोगाकडून निकालासंदर्भातील पुढील प्रक्रियेस मान्यता प्राप्त झाल्यानंतर गुरुवार, दि. 29 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजून 10 मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी डॉ. पाटील यांना विजयी घोषित केले.
निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते डॉ. प्रतापसिंह पाटील यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक माधवी खोडे-चावरे, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत व निवडणूक निरीक्षक श्रीमती माधवी खोडे - चवरे यांच्या देखरेखीखाली मतमोजणी पार पडली. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव या आठ जिल्ह्यांतील 842 मतदान केंद्रांवर झालेल्या या निवडणुकीत 41 उमेदवार रिंगणात होते. मतमोजणीसाठी 70 टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती.
वैध मतांच्या आधारे 88 हजार 558 मतांचा कोटा निश्चित
मतमोजणीच्या प्रारंभी मतपत्रिकांची पडताळणी व वर्गीकरण करण्यात आले. त्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी तीन फेऱ्यांत पूर्ण करण्यात आली. पहिल्या फेरीत 70 हजार 519, तर दुसऱ्या फेरीअखेर एकत्रित 1 लाख 40 हजार 543 मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. मतमोजणीच्या आकडेवारीनुसार एकूण 1 लाख 77 हजार 115 मते वैध, तर 16 हजार 540 मते अवैध ठरली. वैध मतांच्या आधारे विजयासाठी 88 हजार 558 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.
पहिल्या पसंतीच्या मतमोजणीअखेर डॉ. प्रतापसिंह पाटील यांना 73 हजार 931, सतीश चव्हाण यांना 60 हजार 768, अपक्ष उमेदवार रविराज उर्फ अण्णासाहेब सावळे-पाटील यांना 19 हजार 835, तर दिलीप घुगे यांना 8 हजार 439 मते मिळाली. कोणत्याही उमेदवाराने विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण केला नसल्याने निवडणूक नियमांनुसार कमी मते मिळालेल्या उमेदवारांची टप्प्याटप्प्याने वगळणी करून त्यांच्या मतपत्रिकांवरील पुढील उपलब्ध पसंतीक्रमानुसार मतहस्तांतरणाची प्रक्रिया राबविण्यात आली.
39 उमेदवारांच्या वगळणीनंतर अंतिम निकाल
मतहस्तांतरण प्रक्रियेत वगळण्यात आलेल्या उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील पुढील उपलब्ध पसंतीक्रमानुसार उर्वरित उमेदवारांना मते देण्यात आली. दिलीप घुगे यांच्या मतपत्रिकांमधून 2 हजार 285 मते डॉ. पाटील यांना, तर 1 हजार 881 मते सतीश चव्हाण यांना हस्तांतरित झाली. त्यानंतर 39व्या वगळणीत रविराज सावळे-पाटील यांच्या मतपत्रिकांमधून 6 हजार 469 मते डॉ. पाटील यांना, तर 3 हजार 241 मते सतीश चव्हाण यांना हस्तांतरित झाली.
एकूण 41 उमेदवारांपैकी 39 उमेदवारांच्या वगळणीनंतर डॉ. प्रतापसिंह पाटील व सतीश चव्हाण हे दोन उमेदवार शिल्लक राहिले. या टप्प्यावरही कोणत्याही उमेदवाराने निश्चित कोटा पूर्ण केला नव्हता. अंतिम मतमोजणीत डॉ. पाटील यांना 85 हजार 876, तर सतीश चव्हाण यांना 67 हजार 752 मते मिळाली. डॉ. पाटील यांना 18 हजार 124 मतांचे मताधिक्य मिळाले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी अधिकृत निकाल जाहीर करून डॉ. पाटील यांना विजयी घोषित केले.
अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सलग 45 तासांहून अधिक काळ कामकाज
मंगळवार, दि. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता सुरू झालेली मतमोजणी गुरुवार, दि. 29 ऑक्टोबर रोजी पहाटे अंतिम निकाल घोषित होईपर्यंत सलग 45 तासांहून अधिक काळ सुरू होती. मतपत्रिकांची पडताळणी, वर्गीकरण, पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी, उमेदवारांची वगळणी, पुढील पसंतीक्रमानुसार मतहस्तांतरण, अंतिम आकडेवारीची तपासणी व निकाल निश्चिती या प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक निरीक्षक यांच्या देखरेखीखाली पार पाडण्यात आल्या.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कामकाज केले. मतमोजणी पथक, मतपत्रिका वर्गीकरणासाठी नियुक्त पथक व त्यांच्या सहकाऱ्यांनीही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
मतमोजणी केंद्र व परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक बंदोबस्त ठेवला होता. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतमोजणी कालावधीत सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली. याशिवाय मतमोजणी केंद्रावरील सुविधा, साहित्य, स्वच्छता व अन्य आवश्यक व्यवस्थांसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, सेवक तसेच कंत्राटी मनुष्यबळाचेही सहकार्य लाभले.
मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध यंत्रणांनी जबाबदारीने काम केले. निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी निवडणूक निरीक्षक, मतमोजणी प्रक्रियेत सहभागी सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन तसेच सहाय्यक यंत्रणांचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
भाऊबीजेच्या सुट्टीमुळे नळदुर्ग येथील परिवहनचे शिबिर आता 16 नोव्हेंबरला
धाराशिव (प्रतिनिधी)- दिवाळीच्या सणासुदीत शासकीय सुट्टीमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि परिवहन विभागाशी संबंधित कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना विनाकारण त्रास सहन करण्याची वेळ येऊ नये यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव यांनी नळदुर्ग येथील नियोजित परिवहन शिबिराच्या तारखेत बदल केला आहे. बुधवार,11 नोव्हेंबर 2026 रोजी होणारे हे शिबिर आता सोमवार,16 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी दिली.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव यांच्या सन 2026 मधील निश्चित वेळापत्रकानुसार तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे बुधवार,11 नोव्हेंबर रोजी परिवहन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.मात्र सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 11 नोव्हेंबर 2026 रोजी भाऊबीज सणानिमित्त अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.त्यामुळे या दिवशी नियोजित शिबिर घेणे शक्य नसल्याने त्याच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना परिवहन विभागाशी संबंधित कामांसाठी सोयीस्कर सुविधा उपलब्ध व्हाव्यात,तसेच नियोजित दिवशी शिबिराच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर शासकीय सुट्टीमुळे त्यांची निराशा होऊ नये,या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे.विशेषतः दूरवरून येणाऱ्या नागरिकांचा वेळ,प्रवासाचा खर्च आणि श्रम वाया जाऊ नयेत,याची काळजी परिवहन विभागाने घेतली आहे.
त्यानुसार नळदुर्ग येथे बुधवार,11 नोव्हेंबरऐवजी सोमवार,16 नोव्हेंबर 2026 रोजी परिवहन शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.या शिबिरासाठी येण्याचे नियोजन केलेल्या नागरिकांनी सुधारित तारखेची नोंद घेऊन त्यानुसार आपल्या कामांचे नियोजन करावे.
नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि परिवहन विभागाच्या सेवांचा लाभ त्यांना सुलभपणे घेता यावा,यासाठी शिबिराच्या वेळापत्रकातील बदलाची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे नळदुर्ग येथील शिबिराशी संबंधित तुळजापूर तालुक्यातील नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी,असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी केले आहे.
