उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा शहरातील भारत विद्यालयातील कलाशिक्षक संजय परशुराम खामकर यांच्या 26 वर्षांच्या प्रदीर्घ, निष्कलंक आणि आदर्श सेवापूर्तीबद्दल नुकताच उमरगा तालुका कलाध्यापक संघाच्या वतीने सपत्नीक यथोचित सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. 

रेषा, रंग आणि संस्कारांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करणाऱ्या सरांच्या या कृतज्ञता सोहळ्याला अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते संजय खामकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांचा शाल, श्रीफळ, पूर्ण आहेर आणि पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला. 26 वर्षांच्या अविरत सेवेनंतर निवृत्त होत असलेल्या या आदर्श शिक्षकाला निरोप देताना संपूर्ण कलाध्यापक परिवार भावुक झाला होता. या सोहळ्याला शिवाजी उपासे, जीवन चव्हाण, तात्याराव फडताळे, कंटेकुरे, पाशाभाई मुजावर, चन्नवीर कोरे, सतीश कटके, माणिक दूधभाते, प्रशांत गायकवाड, सुधाकर महामुनी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी बोलताना याप्रसंगी कलाशिक्षक तात्याराव फडताळे म्हणाले की, खामकर गुरूजींनी भूमच्या मातीतून उमरग्याच्या ज्ञाननगरीत येऊन कलेचा एक नवा वारसा निर्माण केला. कलाक्षेत्रात उच्च शिक्षण घेतलेले म्हणजे जीडी आर्ट केलेले तालूक्यातील एकमेव कलाशिक्षक होते, शिल्पकला, अक्षरलेखन, क्राप्ट, रेखाचित्रे यात त्यांनी कौशल्य प्राप्त केले होते. हे सर्व कला त्यांनी विद्यार्थ्यात रूजवण्यासाठी निष्ठेने प्रयत्न केले. त्यांनी केवळ चित्रकला शिकवली नाही तर विद्यार्थ्यांच्या जीवनात यशाचे रंग भरले. कला संघाच्या माध्यमातून त्यांनी कलाशिक्षकासाठी कार्य करतानाच अनेक स्पर्धा त्यांनी आपल्या शाळेत भरवल्या त्यांची उणीव आम्हा सर्वांना नेहमीच भासत राहील असे म्हणून सेवानिवृत्तीनिमित्त चिरंतन आरोग्य लाभो अशा शुभेच्छा याप्रसंगी दिल्या.

सत्काराला उत्तर देताना संजय खामकर भावुक झाले. वेळोवेळी मला या तालुक्यातील कलाशिक्षकानी खुप सहकार्य केले यासाठी कलाअध्यापक संघाचे आभार मानले. भारत विद्यालयातील 26 वर्षांचा काळ हा माझ्या आयुष्यातील सर्वात समृद्ध काळ होता अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व कलाशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत गायकवाड तर आभार चन्नवीर कोरे यांनी मानले.

 
Top