धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरातील सांडपाण्याचा पुनर्वापर करून जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. राघूचिवाडी तलावातील पाण्याचा वापर करून सुमारे 50 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची लागवड करण्याचे नियोजन आहे. यासाठी तलावातील पाणीउपसा बंद करण्याच्या आदेशाचा फेरविचार करून आवश्यक परवानगी देण्याचे नियोजन असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणीबरोबरच आगामी काळात जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध असलेल्या पाण्याचा नियोजनबद्ध वापर करण्याची मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात आहे. धाराशिव शहरातून दररोज सुमारे एक कोटी लिटर सांडपाणी भोगावती नदीच्या माध्यमातून राघूचिवाडी तलावात जमा होत. या पाण्यामुळे तलावात सुमारे 75 टक्के पाणीसाठा आजघडीला उपलब्ध असल्याचे परिसरातील शेतकरी बांधवांनी निवेदनात म्हटले आहे. मात्र, पाण्यावर पुरेशी प्रक्रिया होत नसल्याने त्याच्या थेट वापरावर मर्यादा आहेत. पाण्याची गुणवत्ता तपासून, आवश्यक प्रक्रिया आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चारा पिकांसाठी त्याचा वापर करता येईल का, याची तांत्रिक तपासणी आवश्यक आहे. सध्या हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्याचा वापर मर्यादित होतो. मात्र, विशेष बाब म्हणून या पाण्याचा योग्य वापर करून 50 हेक्टर क्षेत्रावर चारा लागवड करण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे. या पाण्यावर सुमारे 50 हेक्टर क्षेत्रात ज्वारीची लागवड केली जाऊ शकते, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

हा उपक्रम एक 'टेस्ट केस' (प्रायोगिक तत्त्वावर) म्हणून राबवला जात असून, यावरून आगामी काळात इतर भागांतही अशा प्रकारे सांडपाण्याचा पुनर्वापर करून चारा निर्मितीला गती मिळू शकेल असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे. एकीकडे जिल्ह्यात पाणीटंचाई आणि संभाव्य चारा टंचाईचे संकट असताना दुसरीकडे राघूचीवाडी तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी तलावातील पाणीउसा बंद करण्याचा आदेश दिल्यामुळे या पाण्याचा शेतीसाठी वापर करता येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या आदेशाचा फेरविचार करून पर्यावरणीय आणि सार्वजनिक आरोग्यविषयक निकषांच्या अधीन राहून चारा लागवडीसाठी पाणी वापरण्याची विशेष परवानगी द्यावी, अशी मागणीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे.


 
Top