भूम (प्रतिनिधी)-  जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील खेळाडूही राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतात, हे भूम तालुक्यातील हिवर्डा गावची कन्या पार्थसारथी अरुण मुंडे हिने आपल्या दमदार कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत 18 वर्षांखालील गटात अजिंक्यपद पटकावत पार्थसारथीने घवघवीत यश संपादन केले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे हिवर्डा गावासह भूम तालुका आणि धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

देशभरातील अव्वल खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पार्थसारथीने आपल्या खेळातील कौशल्य, अचूक फटके, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या बळावर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत विजेतेपदावर नाव कोरले. ग्रामीण भागातून पुढे येत राष्ट्रीय स्तरावर अजिंक्यपद मिळवण्याची तिची कामगिरी जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे. 5 ते 10 ऑक्टोबरदरम्यान ऑल इंडिया टेनिस असोसिएशन आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील 64 अव्वल मानांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत पार्थसारथीने आपल्या खेळातील सातत्य आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी केली. प्रतिस्पर्ध्यांच्या आव्हानांना समर्थपणे तोंड देत तिने 18 वर्षांखालील गटात अजिंक्यपद पटकावले.  बालेवाडीतील सरावातून राष्ट्रीय यशाला गवसणी घातल्याचे पार्थसारथीने सांगितले.


 
Top