तुळजापूर (प्रतिनिधी)- कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवात कुमारिकांच्या पूजनाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. ललित पंचमीपासून तुळजापूर तीर्थक्षेत्री कुमारिका पूजनास प्रारंभ झाला असून, कुमारिकांना देवीचे रूप मानून त्यांचे पूजन, औक्षण, दक्षिणा आणि पुरणपोळीचे भोजन देत स्त्रीशक्तीचा सन्मान केला जात आहे.
या विधीमध्ये प्रथेनुसार एक, सात किंवा पाच कुमारिकांचे पूजन केले जाते. कुमारिकांना सन्मानपूर्वक आसनावर बसवून त्यांचे पूजन करण्यात येते. त्यानंतर त्यांना दक्षिणा देऊन पुरणपोळीचे भोजन दिले जाते. यावेळी सहकुटुंब कुमारिकांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला जातो. कुमारिकांमध्ये देवीचे रूप पाहून त्यांचा सन्मान करण्यामागे स्त्री ही शक्ती, श्रद्धा आणि संस्कारांचे प्रतीक असल्याची भावना अधोरेखित होते. आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होत कुमारिकांचा सन्मान करण्याची ही परंपरा नवरात्रोत्सवातील भक्तिभाव अधिक वृद्धिंगत करत असून, ‘कुमारिकेत देवीचे रूप, स्त्रीशक्तीचा सन्मान हाच खरा संस्कार' असा प्रेरणादायी संदेश देत आहे.
