तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी लाखो भाविकांची गर्दी होत असताना शहरातील जुने छत्रपती संभाजी महाराज बसस्थानक बंद ठेवण्यात आल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. नवरात्रासारख्या महत्त्वाच्या धार्मिक उत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी उपलब्ध असलेले बसस्थानक बंद का ठेवण्यात आले. असा सवाल उपस्थित होत असून, हे बसस्थानक तातडीने सुरू करण्याची मागणी भाविकांकडून होत आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून भाविक तुळजापुरात दाखल होत आहेत. अशा वेळी प्रवाशांची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे अपेक्षित असताना शहरातील जुने बसस्थानक बंद असल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असताना, शहरातील महत्त्वाचे बसस्थानक बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लातूर रोडवरील मध्यवर्ती बसस्थानकातून सोलापूरसह अन्य मार्गांवर जाण्यासाठी एसटी बसची सुविधा उपलब्ध असली, तरी शहरात आलेल्या भाविकांना तेथपर्यंत पोहोचताना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, वृद्ध व्यक्ती, महिला, लहान मुले आणि पायी चालत दर्शनासाठी आलेल्या भाविकांना बसस्थानकापर्यंत जाणे त्रासदायक ठरू शकते. दर्शनानंतर थकलेल्या भाविकांना बस पकडण्यासाठी अतिरिक्त अंतर पार करावे लागल्यास त्यांची दमछाक होते. एकीकडे भाविकांसाठी सोयीसुविधा वाढविण्याचे प्रयत्न होत असताना, दुसरीकडे अस्तित्वात असलेले जुने बसस्थानक बंद ठेवण्यात आल्याने एसटी महामंडळाच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. हे बसस्थानक बंद ठेवण्यामागील नेमके कारण काय, हा निर्णय कोणत्या परिस्थितीत घेण्यात आला आणि तो किती काळासाठी लागू आहे, याबाबत संबंधित प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी होत आहे.
