धाराशिव (प्रतिनिधी) - सर्वसामान्यांना उद्योग उभा करण्यासाठी पैशाची गरज असते. त्यासाठी ते बँकांकडून कर्ज घेतात. परंतू, काहीजणांना ते कर्ज मिळण्यास अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ते बचत गटाकडून कर्ज काढतात, त्याचे दर परवडणारे नाहीत. तसेच सावकार व मायक्रो फायनान्स यांच्याकडून कर्ज काढतात. मात्र, ते मनमानीपणे व्याजाची आकारणी करून सर्वसामान्यांना लुटतात. त्यामुळे या सर्वांवर उत्तम पर्याय हा सहकारी पतसंस्था असल्याचे प्रतिपादन खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि.१७ ऑक्टोबर रोजी केले.
धाराशिव येथील नळेगावकर कॉम्प्लेक्समध्ये श्रमिक महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित, धाराशिवची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी श्रमिक महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा अनिता भालेराव, मराठा सेवा संघाचे नंदकुमार गवारे, नगरसेवक प्रदीप मुंडे, शिवसेना नेते सोमनाथ गुरव, ऋषिकेश मगर, जिल्हा सहकार विकास अधिकारी मधुकर जाधव, नागनाथ नागणे, लिंबराज डुकरे, बप्पा सुर्यवंशी, गफूर शेख, संचालिका शैला दसपुते, महादेवी माळी, सविता बनसोडे, कविता चंदनशिवे, वैशाली शिंदे, सुवर्णा कांबळे, आसमा सय्यद, शाहीन शेख, अंजली भालेराव, अबोली भालेराव, व्यवस्थापकीय संचालक आनंद भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना खा. राजेनिंबाळकर म्हणाले की, सध्या भयावह दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळात कर्ज वसुली करू नका, त्यावर बंधने आणली पाहिजेत, त्या कर्ज वसुली थांबवल्या पाहिजेत अशी मागणी मी सरकारकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. सहकारी पतसंस्था वाढल्या पाहिजेत असे सांगत ते म्हणाले की, मायक्रो फायनान्स ग्राहकांना लुटण्याचे काम करीत असून कर्जाच्या व्याजावर नियंत्रण आणणारा कायदा करावा असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे महिलांचे काटेकोर नियोजन असल्यामुळे त्या व्यवस्थित प्रत्येक क्षेत्रात कारभार हाकतात. तसेच सहकारी पतसंस्था या सभासदांच्या विश्वासावर विस्तारतात. आजच्या महिला श्रमिक पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेस महिलांची लक्षणीय उपस्थिती हे या पतसंस्थेच्या भरभराटीचे लक्षण आहे. कारण ही पतसंस्था महिलांची असून या संस्थेचा सर्व कारभार महिलांच्या हाती आहे. महिलांकडे काटेकोर नियोजन असल्यामुळे त्या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. तसेच दुष्काळी परिस्थिती असून या अस्मानी संकटाचा धैर्याने हार न मानता सामना करावा. कोणीही हार न मानता आत्महत्या सारखा विचार मनात आणू नये. आत्महत्या केल्यामुळे कोणाचेही प्रश्न सुटलेले नाहीत असे त्यांनी सांगितले. तसेच मी केलेले पक्षांतर अनेकांना रुचलेले नाही. मात्र, मी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून माझे काम करणार असून कामातून मी २०२९ ची निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मधुकर जाधव म्हणाले की, सहकारी पतसंस्था सर्वांना अल्प दरात कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या भरवशाच्या संस्था आहेत. सहकार हे क्षेत्र महिला व पुरुष यांना उद्योजक बनविण्यासाठी सातत्याने मदत करणारे आहे. या संस्था व्यवस्थित चालाव्यात यासाठी घेतलेले कर्ज वेळेवर फेडणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नंदकुमार गवारे, सोमनाथ गुरव, प्रदीप मुंडे, सुजित हंगरगर, नागनाथ नागणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सभेचे प्रास्ताविक व्यवस्थापकीय संचालक आनंद भालेराव यांनी तर सूत्रसंचालन तिम्मा माने यांनी व उपस्थितांचे आभार अनुराधा बोडके यांनी मानले. या सभेस सोसायटीचे संचालक व सभासद महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
