धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब-मोहा-येडशी मार्गावरील बंद करण्यात आलेल्या तसेच अन्य मार्गांवर वळविण्यात आलेल्या एसटी बसफेऱ्या तात्काळ पूर्ववत सुरू करून विद्यार्थी, कर्मचारी, नागरिक व रुग्णांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात), जिल्हा शाखा धाराशिवचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी आणि कळंब आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीवर तातडीने कार्यवाही न झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन व रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सन 1990-91 पासून नियमित सुरू असलेल्या कळंबमोहायेडशीबार्शी तसेच बार्शीकुर्डुवाडीपंढरपूर मार्गावरील बसफेऱ्या अन्य मार्गांवर वळविण्यात आल्यामुळे परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याशिवाय कळंब-मोहा-येडशी-धाराशिव, धाराशिव-तुळजापूर-सोलापूर तसेच धाराशिव-बेंबळी-लोहारा-उमरगा या मार्गांवरील बससेवेबाबतही प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सध्या या मार्गावर बससेवेचे योग्य नियोजन नसल्यामुळे सकाळी 11 ते दुपारी 3 या चार तासांच्या कालावधीत येण्या-जाण्यासाठी नियमित बस उपलब्ध नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना, नोकरदारांना, रुग्णांना आणि सर्वसामान्य नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, त्यासाठी प्रत्येकी 30 ते 50 रुपये खर्च करावे लागत आहेत.
कळंबहून सकाळी 8.15 वाजता सुटणारी कळंब-मोहा-येडशी बस धाराशिवपर्यंत सुरू करावी, सकाळी 9.15 वाजताची कळंबमोहायेडशीधाराशिव बसफेरी नियमित सुरू करावी, तसेच कळंब-मोहा-येडशी-बार्शी आणि कळंब-मोहा-येडशी-बार्शी-कुर्डुवाडी-पंढरपूर या बसफेऱ्या पूर्वीच्या मार्गाने सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी दि. 1 ऑक्टोबर 2026 रोजी निवेदन देऊनही अद्याप कार्यवाही झाली नसल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) जिल्हा शाखेने केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन बंद व वळविण्यात आलेल्या बसफेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात आणि प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी राजाभाऊ राऊत यांनी केली आहे. अन्यथा होणाऱ्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.