भुम (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या गोवा बनावटीच्या देशी व विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. परंडा तालुक्यातील चिंचपूर (बु.) येथील तलावाशेजारील शेतात 23 ऑक्टोबर रोजी छापा टाकून तब्बल 7 लाख 92 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी फरार आहेत.
या मोहिमेदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भूम येथील पथकाला गोवा राज्यात निर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या मद्यसाठ्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार निरीक्षक आणि दुय्यम निरीक्षकांच्या पथकाने चिंचपूर (बु.) येथील तलावाशेजारील शेतात छापा टाकला. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये गोवा बनावटीच्या ‘ढोकी संत्रा' देशी दारूच्या 90 मिलिलिटर क्षमतेच्या 17 हजार 700 सीलबंद बाटल्यांचा समावेश आहे. या बाटल्या एकूण 177 बॉक्समध्ये होत्या. तसेच ‘रॉयल स्टॅग' व्हिस्कीच्या 180 मिलिलिटर क्षमतेच्या 336 बाटल्या, म्हणजेच सात बॉक्स जप्त करण्यात आले. या संपूर्ण मद्यसाठ्याची किंमत 7 लाख 92 हजार रुपये असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाराशिवचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भूमचे निरीक्षक एच. बी. लांडे, दुय्यम निरीक्षक बी. ए. राख, वाय. ए. कस्तुरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक ए. बी. कोरे तसेच जवान ए. एन. कोळी, ए. एच. गवारी आणि आर. आर. कदम यांच्या पथकाने या मोहिमेत सहभाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक बी. ए. राख करीत आहेत.
