धाराशिव (प्रतिनिधी)- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी धाराशिव जिल्ह्यातील 76 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात एकूण 62.53 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक आकडेवारी प्रशासनाने जाहीर केली. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीत घट झाली असून, 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यात 66.97 टक्के मतदान झाले होते. धाराशिव जिल्ह्यात या निवडणुकीसाठी एकूण 29 हजार 145 मतदारांची नोंद होती. यामध्ये 22 हजार 745 पुरुष, तर 6 हजार 400 महिला मतदारांचा समावेश होता. त्यापैकी 14 हजार 858 पुरुष आणि 3 हजार 367 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण 18 हजार 225 मतदारांनी मतदान केले. शुक्रवारी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. मागील निवडणुकीत झालेल्या 66.97 टक्के मतदानाच्या तुलनेत यंदा सुमारे 4.44 टक्के घट नोंदविण्यात आली आहे.


वेबकास्टिंगद्वारे मतदान प्रक्रियेवर नजर 

जिल्ह्यातील सर्व 76 मतदान केंद्रांवर कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या विशेष वॉर रूममधून सर्व मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेवर थेट निगराणी ठेवण्यात आली. वेबकास्टिंगच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवले.


जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रांची पाहणी 

धाराशिव शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथील मतदान केंद्र क्रमांक 628 ला जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच उमरगा तालुक्यातील डाळिंब आणि बलसूर येथील मतदान केंद्रांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली व आवश्यक सूचना दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. आता या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे.


 
Top