कळंब (प्रतिनिधी)- शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील इतिहास विभाग व इनरव्हील क्लब, कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही 'जागर स्त्रीशक्तीचा - गौरव तिच्या कर्तृत्वाचा' हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. 

कार्यक्रमासाठी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. नयन राजमाने प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी 'स्त्रीशक्ती : संघर्षातून परिवर्तनाकडे' या विषयावर मार्गदर्शन केले. स्त्री शिक्षणाचे महत्त्व, तिचे कर्तृत्व आणि संघर्षातून परिवर्तनाकडे होणारी वाटचाल यावर त्यांनी प्रकाश टाकला. “आत्मविश्वास आणि स्वावलंबनाच्या जोरावर आजच्या स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करावे,“ असे आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानप्रसारक मंडळ, येरमाळाचे सचिव डॉ. अशोक मोहेकर होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, “स्त्रीचा खरा सन्मान हा केवळ कार्यक्रमांपुरता मर्यादित न राहता कृतीतून झाला पाहिजे. त्यासाठी पुरुषांच्या मानसिकतेत बदल होणे ही काळाची गरज आहे.“या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे समाजात आपल्या कार्यातून वेगळा ठसा उमटवणाऱ्या पाच सामान्य महिलांचा 'नवदुर्गा' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शैला चोंदे,  विशाखा सरदार, अंजली शिंदे, ज्ञानेश्वरी मगर, अनिता लोमटे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. पूर्वा पोरे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य के. डी. जाधव, जयंत भोसले, इतिहास विभाग प्रमुख डॉ. के. डब्ल्यू. पावडे, डॉ. वर्षा सरवदे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दत्ता साकोळे यांनी केले, पाहुण्यांचा परिचय डॉ. मीनाक्षी जाधव यांनी करून दिला, सूत्रसंचालन प्रा. सुशील शेळके यांनी केले तर आभार प्रा. अर्चना मुखेडकर यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व इनरव्हील क्लबच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top