तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठवाड्यातील दुष्काळ पार्श्वभूमीवर शासनाकडून अधिक प्रभावी उपाययोजना मिळवून देण्याबरोबरच समाज म्हणूनही योगदान देण्याबाबत चर्चा करण्यासाठी पुणे येथे मंगळवार, दि. 6 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता गांजवे चौक, पुणे येथील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन येथे होणार आहे.
बैठकीचे आयोजन एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुभाष वारे आणि मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांच्या वतीने करण्यात आले. मराठवाड्यात तीव्र पाणीटंचाई, चाऱ्याची कमतरता, शेतीसमोरील संकट तसेच रोजगाराच्या उपलब्धतेतील घट यांसारख्या प्रश्नांना आगामी काळात सामोरे जावे लागू शकते. शासनाने काही उपाययोजना जाहीर केल्या असल्या तरी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता मदत व उपाययोजना अधिक व्यापक करण्याची आवश्यकता असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. या अनुषंगाने शासनाशी संवाद, सातत्याने पाठपुरावा तसेच आवश्यक त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन करून दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी भरीव मदत मिळवून देण्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. त्याचबरोबर दुष्काळाच्या संकटात समाज म्हणून नागरिकांनी कोणते योगदान देता येईल, यावरही विचारविनिमय करण्यात येणार आहे.
या बैठकीत दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम निश्चित करण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा केली जाणार आहे. पुणे शहरात वास्तव्यास असलेल्या मराठवाड्यातील नागरिकांनी तसेच दुष्काळग्रस्त भागासाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी बैठकीस उपस्थित राहून कृती कार्यक्रम निश्चितीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक माहिती हवी असल्यास अधिक माहितीसाठी उपेंद्र टण्णू (9881701881) आणि ॲड. विलास राऊत (9923903465) यांच्याशी संपर्क साधावा. असे आ वाहन संयोजकांनी केले आहे.