भूम (प्रतिनिधी)- दुष्काळाच्या झळांनी होरपळणाऱ्या भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलवण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी पुढाकार घेतला आहे. यंदाची दिवाळी आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही कुटुंबासाठी निराशेची ठरू नये, या भावनेतून त्यांनी ‌‘माणुसकीची दिवाळी' या विशेष उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत मतदारसंघातील सर्व रेशनकार्डधारकांना प्रत्येकी पाच किलो साखर, तर भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना दिवाळी फराळासह जीवनावश्यक वस्तूंचे किट घरपोच देण्यात येणार आहे.

यंदा भूम-परंडा-वाशी मतदारसंघातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दुष्काळी परिस्थितीचा मोठा सामना करावा लागत आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेती व्यवसाय अडचणीत आला असून, अनेक कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत दिवाळीसारखा आनंदाचा सण साजरा करताना सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागू नये, यासाठी आमदार डॉ. सावंत यांनी हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. ‌‘मतदारसंघ हे केवळ राजकारणाचे क्षेत्र नसून माझे कुटुंब आहे,' या भावनेतून त्यांनी नागरिकांप्रती आपुलकी व्यक्त केली आहे. दुष्काळाच्या संकटात अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना दिलासा देण्याबरोबरच त्यांच्या घरातही दिवाळीचा गोडवा निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.


सर्व रेशनकार्डधारकांना पाच किलो साखर

‌‘माणुसकीची दिवाळी' उपक्रमांतर्गत मतदारसंघातील सर्व रेशनकार्डधारकांना प्रत्येकी पाच किलो साखर देण्यात येणार आहे. दिवाळीच्या फराळासाठी साखरेची आवश्यकता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना विशेष दिवाळी किट देण्यात येणार असून, त्यामध्ये सणासाठी आवश्यक खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंचा समावेश असेल.


फराळापासून अभ्यंगस्नानाच्या साहित्यापर्यंत

या विशेष दिवाळी किटमध्ये रवा, मैदा, हरभरा डाळ, स्वयंपाकाचे तेल, चिवडा मसाला, चिरमुरे आणि चहापत्ती यांसारख्या वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. तसेच अभ्यंगस्नानासाठी सुगंधी तेल, मोती साबण आणि सुगंधी उटणे देण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळीचा फराळ तयार करण्यापासून सणाच्या पारंपरिक विधींपर्यंत आवश्यक साहित्य गरजू कुटुंबांना उपलब्ध होणार आहे.


‌‘कठीण परिस्थितीत खचून जाऊ नका'

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना धीर देताना आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी, परिस्थिती कितीही कठीण असली तरी नागरिकांनी खचून जाऊ नये. आपला भाऊ आणि मित्र म्हणून आपण सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. दुष्काळाच्या सावटातही मतदारसंघातील एकाही कुटुंबाची दिवाळी कडू होऊ देणार नाही, अशी भावना व्यक्त केली आहे.


शिवसैनिकांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचणार किट

या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच ग्रामपातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुढाकार घेणार आहेत. संबंधित कुटुंबांपर्यंत दिवाळी किट सन्मानपूर्वक आणि आपुलकीने पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोणताही गाजावाजा न करता गरजू कुटुंबांच्या घरापर्यंत मदत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे.


दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कुटुंबांना सणाच्या काळात आधार देणारा हा उपक्रम ठरणार आहे. दिवाळी हा आनंद, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा सण आहे. याच भावनेतून राबविण्यात येणाऱ्या ‌‘माणुसकीची दिवाळी' उपक्रमामुळे संकटाच्या काळात गरजू कुटुंबांना दिलासा मिळण्यास मदत होणार असून, त्यांच्या घरात आनंदाचा दीप प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 
Top