धाराशिव (प्रतिनिधी)-  तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ‌‘उमेद मॉल' उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या मॉलच्या इमारत बांधकामासाठी आपल्या महायुती सरकारने 19 कोटी 99 लाख 99 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. मंगळवारी 27 ऑक्टोबर रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या मॉलमुळे महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या आपल्या प्रयत्नांना सरकारने भक्कम पाठबळ दिले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू आणि उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथे वर्षभर लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर उमेद मॉलमुळे महिला बचत गटांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 15 हजार 664 महिला स्वयंसहाय्यता समूह स्थापन करण्यात आले आहेत. या समूहांमध्ये 1 लाख 47 हजार 529 कुटुंबांतील महिलांचा समावेश आहे.  श्री तुळजाभवानी मंदिरापासून सुमारे 500 मीटर अंतरावर हा मॉल उभारण्यात येणार आहे. मॉलच्या बांधकामाचे काम सुरू झाल्यानंतर दोन वर्षांत ते पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. 


महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना

या उमेद मॉलमुळे केवळ उत्पादननिर्मितीपुरते मर्यादित न राहता विक्री, ब्रँडनिर्मिती आणि व्यवसायवाढीच्या संधी माता भगिनींना उपलब्ध होऊ शकतात. तुळजापूरला येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता स्थानिक उत्पादनांच्या विक्रीलाही चालना मिळेल. त्यामुळे ग्रामीण भागातील माता भगिनींच्या आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच स्थानिक रोजगारनिर्मिती आणि जिल्ह्यातील उत्पादनांच्या बाजारपेठ विस्ताराला मदत मिळणार असल्याचा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

 
Top