धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामाता नॅचरल शुगर युनिट क्र. 02, रोशनपुरी ता. माजलगाव जि. बीड येथे प्रतिदिन 1,250 मेट्रिक टन गाळप क्षमता असलेल्या गुळ पावडर कारखान्यात 51 हजार गुळ पावडर पोत्यांचे पूजन उत्साहात करण्यात आले. रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

संचालक शंकर गाडे, माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय रामोड, हेड कॉन्स्टेबल संजय राठोड आणि कॉन्स्टेबल इंद्रजीत शेंडगे यांच्या शुभहस्ते गुळ पावडर पोत्यांचे पूजन करण्यात आले. रुपामाता नॅचरल शुगर्सच्या माध्यमातून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत ऊस गाळपाची सुविधा उपलब्ध होत असून, शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला योग्य भाव मिळण्यास मदत होत आहे. गुळ पावडर निर्मितीच्या माध्यमातून कृषी उत्पादनाला मूल्यवर्धन मिळत असून, ग्रामीण भागातील औद्योगिक विकासालाही चालना मिळत आहे.

ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी कामगार, वाहतूक ठेकेदार, वाहनचालक तसेच कारखान्यातील विविध विभागांतील कर्मचारी यांच्यासाठी हा उद्योग रोजगार आणि आर्थिक उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन ठरत आहे. कारखान्याच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून, परिसरातील वाहतूक, कृषी सेवा आणि पूरक व्यावसायिक क्षेत्रांनाही चालना मिळत आहे. ग्रामीण भागात उद्योग उभारणी करून स्थानिक पातळीवर गुळ पावडर उत्पादनामुळे पारंपरिक ऊस शेतीला औद्योगिक प्रक्रियेची जोड मिळत असून, परिसराच्या आर्थिक विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे.

यावेळी ॲड. गुंड यांनी उपस्थित शेतकरी, ऊसतोडणी व वाहतूक क्षेत्रातील प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. उद्योगाच्या प्रगतीमध्ये शेतकरी, कामगार, कर्मचारी आणि संबंधित व्यावसायिकांचा सहभाग महत्त्वाचा असून, सर्वांच्या सहकार्याने उद्योगाची वाटचाल अधिक सक्षम होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यकारी संचालक ॲड. अजित गुंड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रुपामाता उद्योग समूहाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. कार्यक्रमास ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी व वाहतूक ठेकेदार, वाहनचालक, खातेप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन पाटील यांनी केले.


 
Top