धाराशिव (प्रतिनिधी)-  मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, त्यांच्या 18 वर्षांच्या कार्यकाळाचा हिशोब आता पदवीधर मतदारांकडून मागितला जात आहे. अनेक जिल्ह्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सतीश चव्हाण यांची मोठी कोंडी झाली आहे.

चव्हाण यांच्या 18 वर्षांच्या कार्यकाळात पदवीधरांचे किती प्रश्न मार्गी लागले, बेरोजगार पदवीधरांसाठी नेमके काय काम झाले, तसेच निवडून आल्यानंतर सहा वर्षांच्या कालावधीत पदवीधरांच्या प्रश्नांसाठी ते कुठे होते, असे सवाल मतदारांकडून उपस्थित केले जात आहेत. मागील पदवीधर निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी तिसऱ्यांदा विजय मिळविला, तर भाजपचे शिरीष बोराळकर यांचा पराभव झाला होता. त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या विरोधात प्रचार केला होता.

मात्र, आता राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-शिवसेना महायुतीत असल्याने मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत ज्यांच्या विरोधात प्रचार केला, त्यांच्याच विजयासाठी आता भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मैदानात उतरावे लागणार आहे. या निर्णयामुळे भाजपच्या स्थानिक पातळीवर नाराजीची चर्चा सुरू झाली असून, ती आता सोशल मीडियावरही व्यक्त होऊ लागली आहे. धाराशिव शहरातील भाजपचे माजी नगरसेवक प्रवीण पाठक यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून पक्षातील कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. पाठक यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ज्याच्या विरोधात आतापर्यंत मतं मागितली, आज त्यांनाच मतदान करा म्हणायची वेळ आलेली आहे.   भाजपमधून उमटणारे नाराजीचे सूर यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीसमोर अंतर्गत नाराजीचे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे

 
Top