धाराशिव (प्रतिनिधी)- काँग्रेसच्या काळात निवडणूक आयोगाचे आयुक्त नेमण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत केली जात होती. मात्र, भाजप सरकारने ही प्रक्रिया रद्द करून गृह मंत्रालयाच्या माध्यमातून राबविण्यास सुरुवात केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नियुक्ती केलेल्या ज्ञानेशकुमार यांना हाताशी धरून देशातील 13 कोटी मतदारांना वगळले आहे. त्यांना त्यांच्या संविधानिक मतदानाच्या हक्कापासून दूर लोटली असून त्यांना पुन्हा त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी काँग्रेस संपूर्ण देशभरामध्ये.....लोकशाही वाचवा, संविधान वाचवा , मत वाचवा, देश वाचवा....ही मोहीम दि.1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत वगळलेल्या 13 कोटी मतदारांना पुन्हा संविधानिक हक्क मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी भरतसिंह सोलंकी यांनी दि.24 ऑक्टोबर रोजी केले.
धाराशिव शहरातील काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, माजी जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील, ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, लातूर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख, राजभाऊ शेरखाने, प्रशांत पाटील, खलील सय्यद, अग्निवेश शिंदे, धनंजय राऊत, विनोद वीर, अरविंद बेडगे, भैय्या निरफळ, आयुब पठाण, दयानंद पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना सोलंकी म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजप निवडून येत असे असून भाजपने ईव्हीएम मशीन आणि मतदार यादीमध्ये घोटाळे केले केले असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच एसआयआरच्या 62 लाख लोकांना वगळले आहे. वगळलेल्या लोकांना त्यांच्या मतदानाच्या स्वातंत्र्यापासून दूर लोटण्याचे महापाप भाजपने केले असून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसने मोठे योगदान दिले आहे. संविधानाने देशातील नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आहे. परंतू, भाजपला देशाच्या स्वातंत्र्याचे किंवा नागरिकांच्या स्वतंत्र्याची काही देणे घेणे नसल्याचा घणाघात त्यांनी केला. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जुन्या मतदाराला पुन्हा नव्याने नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. विशेष म्हणजे अर्थतज्ञ अमर्त्य सेन व सुभाष चंद्र बोस यांच्या नातवाचे देखील नाव मतदार यादीतून वगळले आहे. यांची मतचोरी हरियाणापासून पकडली गेली. ज्ञानेशकुमार यांच्या दोन सहकाऱ्यांनी फक्त 10 दिवसांमध्ये चक्क 14 वेळेस ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयाला आव्हान दिल्याचे त्यांनी सांगितले. मोदी व शहा हे ज्ञानेशकुमार यांना ताकद देत असल्याचा आरोप त्यांनी केला. 2014 ला लोकपाल आणायच्या नावाखाली अण्णा हजारे यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात गोंधळ घातला. सत्तेवर आल्यानंतर भाजपने लोकपाल बिल का आणले नाही ? असा प्रश्नही त्यांनी विचारला. पश्चिम बंगाल मध्ये भाजपने सत्तेवर येतात अमित शहा च्या सांगण्यावरून सर्व मुख्य अधिकाऱ्यांना त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचा आरोप त्यांनी केला.
एसएसआर कार्यक्रम 17 राज्यात
एसआयआर ऐवजी एसएसआर कार्यक्रम देशातील सतरा राज्यांमध्ये बनवला आहे. आगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातल्या असून भाजपचा त्या ठिकाणी निश्चितपणे पराभव होणार असल्याचा आत्मविश्वास सोलंकी यांनी व्यक्त केला. वगवलेले 13 कोटी मतदार नेमके गेले कुठे, त्यांना का वगळले ? असा प्रश्न विचारीत ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जिल्हा, तालुका, पंचायत समिती, व गाव निहाय बीएलए - 2 नेमून वगळलेल्या मतदारांना व नवीन मतदारांना मतदार यादी मध्ये समावेश करून ती यादी बीएलओकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी रामलीला मैदानावर दि.1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2026 या दोन महिन्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. यामध्ये देशभरातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सोलंकी यांनी आवर्जून सांगितले.
