भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील रामेश्वर येथे बिबट्याने शेतकऱ्याच्या गायीवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना गुरुवार, दि. 23 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली. दाजी उगलमुगले या शेतकऱ्याची गाय बिबट्याने अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत ओढत नेऊन फस्त केली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर येथील शेतकरी दाजी उगलमुगले यांची गाय शेतात असताना मध्यरात्री बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर गायीला सुमारे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत ओढत नेऊन तिचा फडशा पाडला. सकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर परिसरात पाहणी केली असता शेतामध्ये बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. त्यामुळे या भागात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भूम तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय करतात. शेतातील गोठे किंवा मोकळ्या जागेत जनावरे बांधली जात असल्याने वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. रामेश्वर येथील या घटनेमुळे शेतात आणि शिवारात जनावरे ठेवणाऱ्या पशुपालकांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या वतीने शेतकऱ्यांना आपल्या जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी जनावरे सुरक्षित गोठ्यात बांधावीत, गोठ्याच्या परिसरात पुरेसा प्रकाश ठेवावा आणि जनावरांना उघड्यावर एकटे सोडू नये, अशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शिवारात जाताना सतर्क राहावे. रामेश्वर परिसरात बिबट्याच्या ठशांसह गायीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाने परिसरातील बिबट्याच्या वावराबाबत पाहणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top