धाराशिव (प्रतिनिधी)- श्री गणेश नगर तरुण मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त ‘श्री रामायण' या धार्मिक व सांस्कृतिक संकल्पनेवर आधारित भव्य-दिव्य गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. श्री गणेश नगर, म्हसोबा चौक येथून उत्साहात निघालेली ही मिरवणूक प्रशासनाने निश्चित केलेल्या मार्गावरून शांतता, शिस्त व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
गणेश विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने केलेले मार्गदर्शन, नियोजन आणि सहकार्य अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. प्रशासनाने निश्चित केलेल्या नियमावलीचे व मार्गदर्शक सूचनांचे मंडळाच्या वतीने पूर्णपणे पालन करण्यात आले. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. या संपूर्ण प्रक्रियेत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे व त्यांच्या संपूर्ण पोलीस पथकाने दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यानिमित्त शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक कुमार दराडे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष विशाल पवार, कोषाध्यक्ष सागर शेरकर, सचिव वैभव देवकर, मंडळाचे मार्गदर्शक अभय इंगळे व हनुमंत यादव, तसेच मंडळाचे सदस्य बालाजी माने व चैतन्य माने, श्रीनिवास शेरकर उपस्थित होते. गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. प्रशासन आणि गणेश मंडळांच्या समन्वयातून उत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडतो. यासाठी सहकार्य करणाऱ्या धाराशिव शहर पोलीस प्रशासनाचे श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
