धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि युवा ग्राम विकास मंडळ, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशिक्षण हॉल येथे पोक्सो कायद्यावर धाराशिव जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.

या प्रशिक्षणासाठी सचिन पांडकर  अपर पोलीस अधीक्षक, मारुती शेळके  पोलीस निरीक्षक, इकबाल सय्यद  पोलीस निरीक्षक, भाग्यश्री पाटील  सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), विजयकुमार माने  अध्यक्ष, बाल कल्याण समिती धाराशिव, माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, ॲड. संजय सेंगर, ॲड. अभय पाथ्रुडकर, वैशाली पाटील  बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक), विकास चव्हाण  प्रकल्प समन्वयक, चाईल्ड हेल्पलाईन धाराशिव, मैना भोसले व सुजाता माळी  सदस्य, बाल कल्याण समिती धाराशिव, प्रज्ञा बनसोडे  सोशल वर्कर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष धाराशिव आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील प्रत्येकी 2 पोलीस अधिकारी उपस्थित होते.

एच. पी. देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर प्रशिक्षणप्रसंगी मार्गदर्शन करताना न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी सांगितले की, पोक्सोसारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्यास 24 तासांच्या आत प्रथम खबर अहवालाची प्रत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठवावी. तसेच बालिकेची तातडीने वैद्यकीय तपासणी करून व तिचा जवाब नोंदवून बालकास बाल कल्याण समितीसमोर सादर करावे. ही सर्व प्रक्रिया त्यांनी अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सांगितली. अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी पोक्सो प्रकरणांमध्ये 'मनोधैर्य योजने'चा अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करणे, बालिकेचे बँकेत खाते उघडणे आणि इतर प्रक्रिया पूर्ण करून विहित नमुन्यात अर्ज दाखल करण्याबाबत मार्गदर्शन केले. बाल कल्याण समिती धाराशिव अध्यक्ष विजयकुमार माने, ॲड. संजय सेंगर, ॲड. अभय पाथ्रुडकर यांनी मार्गदर्शन केले.

 
Top