धाराशिव (प्रतिनिधी)-  बदलत्या काळात केवळ शिक्षण पुरेसे नसून शिक्षणाला कौशल्याची जोड मिळणे आवश्यक आहे.आज तांत्रिक शिक्षण ही काळाची गरज असून स्वावलंबी होण्यासाठी प्रत्येक युवकाकडे कौशल्य असले पाहिजे.विविध क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे.ही गरज पूर्ण करण्यासाठी युवकांचे कौशल्य विकसित व्हावे,त्यांना प्रशिक्षणासह रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन विविध योजना राबवित आहे.युवकांनी या योजनांची माहिती घेऊन कौशल्याच्या बळावर स्वतःच्या पायावर उभे राहावे,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव यांनी केले.

लोहारा तालुक्यातील मुर्शदपूर येथील नवतरुण गणेश मंडळाच्या गणरायाच्या स्थापनेच्या ठिकाणी दि.19 सप्टेंबर रोजी आयोजित ‌‘लोकसंवाद' कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून गुरव बोलत होते.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे आणि चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक विकास चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

या लोकसंवादातून श्री.गुरव यांनी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन विभागाच्या विविध योजना, प्रशिक्षण व रोजगाराच्या संधींची,तर श्री.कोवे यांनी महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महिला व बालकांच्या कल्याण,संरक्षण व पुनर्वसनविषयक योजनांची ग्रामस्थांना माहिती दिली.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती गावातच आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून थेट मिळाल्याने हा ‌‘लोकसंवाद' केवळ माहिती देणारा कार्यक्रम न राहता शासकीय योजना आणि पात्र लाभार्थी यांच्यातील थेट दुवा ठरला.

श्री.गुरव यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन विभागाच्या योजनांची माहिती देताना सांगितले की,युवकांना रोजगारक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना,प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आणि पंडित दीनदयाळ कौशल्य विकास योजना यांसह विविध कौशल्यविषयक योजना राबविण्यात येतात.युवकांना त्यांच्या आवडीनुसार आणि रोजगाराच्या गरजेनुसार विविध प्रकारचे प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध आहे.कौशल्य प्रशिक्षणाची आवश्यकता असलेल्या युवकांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.रोजगार,कौशल्य प्रशिक्षण आणि विविध योजनांची माहिती ‌‘महास्वयम्' पोर्टलवरही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

दि.29 सप्टेंबर रोजी लोहारा येथे आयोजित ‌‘रोजगार महाकुंभ'मध्ये तालुक्यातील जास्तीत जास्त युवावर्गाने सहभागी होऊन रोजगाराच्या उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा.विशेषतः 21 ते 35 वर्षे वयोगटातील युवकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मराठा समाजासाठी कार्यरत असून महामंडळाच्या योजनांमधून पात्र लाभार्थ्यांना व्याज परताव्याचा लाभ मिळतो.धाराशिव येथील सामाजिक न्याय भवनात विविध महामंडळांची कार्यालये आहेत.नागरिकांनी या कार्यालयांना भेट देऊन योजनांची माहिती घ्यावी आणि पात्रतेनुसार त्यांचा लाभ घ्यावा.पीएम विश्वकर्मा योजनेतूनही कौशल्याला चालना देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात,असे श्री.गुरव यांनी सांगितले.

महिला बचत गटांना विविध योजनांच्या माध्यमातून उद्योग-व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते.पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग तसेच महिला व बालविकास विभागामार्फतही विविध योजना राबविण्यात येतात.त्यांचा लाभ घेऊन स्वयंरोजगाराची वाट निवडता येते.आज मोठे उद्योजक म्हणून नावारूपाला आलेल्या अनेकांनी शून्यातून व्यवसायाची सुरुवात केली आहे.त्यामुळे कोणत्याही व्यवसायाला कमी लेखू नका. ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे,त्या क्षेत्रात कठोर मेहनत घ्या,असा सल्ला श्री.गुरव यांनी दिला. 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसह विविध शासकीय योजनांची माहिती घेत राहावी.‌‘लोकराज्य',उद्योजकतेविषयक मासिके आणि विविध वृत्तपत्रांचे नियमित वाचन करून ज्ञान अद्ययावत ठेवले तर यशाचा मार्ग अधिक सुकर होतो,असेही श्री.गुरव यांनी सांगितले.

बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे यांनी महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली.शून्य ते 18 वर्षे वयोगटातील बालकांचे संरक्षण,संगोपन आणि पुनर्वसनासाठी शासनाच्या विविध योजना कार्यरत आहेत.बालसंगोपन योजना,बालगृह योजना तसेच अन्यायग्रस्त,निराधार आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात.पात्र बालकांना बालसंगोपन योजनेत आर्थिक लाभ दिला जातो.अनाथ बालकांना नियमानुसार अनाथ प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था असून पात्र अनाथ बालकांसाठी शासकीय सेवेत एक टक्का आरक्षणाची तरतूद आहे,अशी माहिती त्यांनी दिली.

बालकांना कायदेशीर प्रक्रियेतून दत्तक घेण्यासाठी दत्तक ग्रहणाची व्यवस्था असून महिला व बालकांचे हक्क आणि संरक्षणासाठी विविध कायदेशीर तरतुदीही आहेत.महिलांच्या संरक्षणासाठी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा कार्यरत आहे.महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.अडचणीत असलेल्या महिलांनी या व्यासपीठाचा उपयोग करून आपल्या समस्या प्रशासनासमोर मांडाव्यात आणि त्यांचे निराकरण करून घ्यावे.महिला व बालकांसाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या योजनांची माहिती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचावी आणि पात्र लाभार्थ्यांनी त्यांचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री.कोवे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ‌‘लोकसंवाद' कार्यक्रमाची भूमिका विशद केली.शासन सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविते.मात्र,या योजनांची माहिती प्रत्यक्ष पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे तितकेच महत्त्वाचे आहे.गणेशोत्सवासारख्या लोकसहभागाच्या उत्सवातून शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी थेट ग्रामस्थांशी संवाद साधत असल्याने योजना समजून घेण्याची आणि त्याबाबतच्या शंकांचे निरसन करून घेण्याची संधी नागरिकांना मिळते.या माहितीचा उपयोग करून ग्रामस्थांनी संबंधित कार्यालयांशी संपर्क साधावा आणि अटी व पात्रतेनुसार योजनांचा लाभ घ्यावा,असे त्यांनी सांगितले.

मुर्शदपूर ग्रामस्थांनी ‌‘एक गाव,एक गणपती' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवून गावातील एकोपा सिद्ध केला आहे. नवतरुण गणेश मंडळाने सामाजिक सलोखा आणि सामूहिक उत्सवाचा आदर्श निर्माण केला असून जिल्ह्यातील अन्य गणेश मंडळांनीही त्याचे अनुकरण करावे.गावागावांत ‌‘एक गाव,एक गणपती' संकल्पना राबविल्यास उत्सवातील अनावश्यक खर्चाला आळा घालून त्या माध्यमातून सामाजिक,शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि जनजागृतीचे उपक्रम राबविता येतील.असे श्री.खडसे यांनी सांगितले.

‌‘लोकसंवाद'मधून मिळालेली योजनांची माहिती ग्रामस्थांना भविष्यात प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेल,असा विश्वास व्यक्त करत त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला नवतरुण गणेश मंडळाचे अध्यक्ष अनिल बलसुरे, उपाध्यक्ष शेखर पाटील तसेच मंडळाचे सदस्य विजयकुमार मोरे,सदानंद मोरे,पवन मोरे,रणधीर माने,नामदेव मोरे,गणेश मोरे,लहू मोरे, अभिजीत पाटील,सोमनाथ सुरवसे, तुकाराम पाटील,दीपक बनसोडे,रवी घोडके आणि विठ्ठल मोरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‌‘विकास वाटा' या घडीपुस्तिकेचे ग्रामस्थांना वितरण करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आलेले गाव,‌‘एक गाव,एक गणपती'मधून जपलेला सामाजिक एकोपा आणि त्याच व्यासपीठावर कौशल्यापासून रोजगारापर्यंत, स्वयंरोजगारापासून उद्योजकतेपर्यंत तसेच महिला- बालकल्याणापासून बाल संरक्षणापर्यंतच्या योजनांची अधिकाऱ्यांकडून थेट मिळालेली माहिती,यामुळे मुर्शदपूरचा ‌‘लोकसंवाद' शासनाच्या योजना ग्रामस्थांच्या दारापर्यंत पोहोचविणारा आणि गणेशोत्सवाला समाजप्रबोधनाची विधायक जोड देणारा उपक्रम ठरला.


 
Top