धाराशिव (प्रतिनिधी)- शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती थेट गावातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी,पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेता यावा आणि महिला,बालक,युवक व गरजू कुटुंबांना शासकीय यंत्रणेचा आधार मिळावा,या उद्देशाने तुळजापूर तालुक्यातील तळवडा येथील हनुमान मंदिरात गणेश मंडळाच्या श्री गणेश स्थापना ठिकाणी दि.19 सप्टेंबर रोजी ‘लोकसंवाद' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्ञानेश्वर पांडगळे होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे,जिल्हा कौशल्य विकास रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व चाइल्ड हेल्पलाइनचे जिल्हा समन्वयक विकास चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिला व बालकांच्या संरक्षणासाठी शासनाच्या अनेक योजना आणि कायदे आहेत. मात्र,बालविवाह रोखण्यासाठी केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय,धाराशिवच्या वतीने आयोजित या ‘लोकसंवाद' कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.कोवे बोलत होते.
तळवडा गावाने ‘एक गाव,एक गणपती' उपक्रमातून गावातील एकोप्याचा आदर्श निर्माण केला आहे.याच गणेशोत्सवाच्या उत्साही आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात हनुमान मंदिरातील गणेश मंडळाच्या श्री गणेश स्थापना ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमातून महिला व बालविकास,बाल संरक्षण,रोजगार- स्वयंरोजगार,कौशल्य विकास आणि विविध शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना त्यांच्या गावातच उपलब्ध झाली.
कोवे म्हणाले,महिला व बालकांसाठी महिला व बालविकास विभागाच्या अनेक योजना कार्यरत आहेत.पीडित महिलांसाठी शक्ती सदन योजना,बाल न्याय अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी, बालसंगोपन योजना,मिशन वात्सल्य योजना,बालकांसाठी बालगृहे,कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण आणि शुभमंगल योजनेसारख्या विविध योजना विभागामार्फत राबविण्यात येतात. अन्यायग्रस्त किंवा अडचणीत असलेल्या महिलांनी मदतीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा. बालसंगोपन योजनेचा लाभ शासनाने निश्चित केलेल्या अटी व शर्तींनुसार दिला जातो. मिशन वात्सल्य योजनेच्या लाभासाठीही संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा,असे त्यांनी सांगितले.
बालविवाहासारख्या सामाजिक समस्येला आळा घालण्यासाठी समाजाचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून श्री. कोवे म्हणाले,प्रत्येक नागरिकाने आपल्या गावात बालविवाह होणार नाही याबाबत दक्ष राहिले पाहिजे. पालकांनी आपल्या बालकांची काळजी घेण्याबरोबरच त्यांच्याशी नियमित संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या पाहिजेत.मुलांच्या मनात काय सुरू आहे,त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे,हे समजून घेण्याचा पालकांनी प्रयत्न केला तर अनेक समस्या वेळीच सोडविता येऊ शकतात.
कौशल्यातून युवकांनी स्वावलंबनाचा मार्ग निवडावा
जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त श्री.गुरव म्हणाले,निसर्गाच्या संकटांचा आपल्याला सामना करावा लागत असून या संकटांवर मात करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.बदलत्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे एखादे कौशल्य असणे गरजेचे आहे.शासन प्रत्येकालाच नोकरी देऊ शकत नाही,मात्र युवकांना रोजगारक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आणि पंडित दीनदयाळ कौशल्य विकास योजना यांसह विविध कौशल्यविषयक योजना राबविण्यात येतात.कोणत्याही युवकाला कौशल्य प्रशिक्षणाची आवश्यकता असल्यास जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा,असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात 29 सप्टेंबर रोजी आयोजित ‘रोजगार महाकुंभ' मेळाव्यात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन रोजगाराच्या उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री.गुरव यांनी केले.तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन मराठा समाजातील युवक व नागरिकांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा. महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बँकांकडे व्यवस्थित आणि सक्षम प्रकल्प प्रस्ताव तयार करून सादर करावेत,असे मार्गदर्शनही त्यांनी केले.
जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासारख्या योजनांचा लाभ घेता येतो.कमी शिक्षण घेतलेली व्यक्तीदेखील जिद्द,मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर मोठे काम उभे करू शकते.कोणताही व्यवसाय उभा करताना जिद्द आणि सातत्यपूर्ण मेहनत अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः महिलांकडे मोठ्या प्रमाणात विविध कौशल्ये आहेत.या कौशल्यांना व्यवसायाची जोड दिल्यास महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता येईल,असेही गुरव यांनी सांगितले.
चव्हाण यांनी बालकांच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या व्यवस्थेची माहिती दिली.बालकांना संकटाच्या वेळी तातडीने मदत मिळावी यासाठी चाइल्ड हेल्पलाइन 1098 कार्यरत आहे. बालविवाह प्रतिबंध अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी गावपातळीवर प्रत्येकाने जागरूक राहणे आवश्यक आहे.गावात कोणत्याही बालिकेचा बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्यावी.एखादे बालक अडचणीत असल्यास किंवा त्याला मदतीची आवश्यकता असल्यास टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधावा,असे त्यांनी सांगितले.
‘लोकसंवाद' म्हणजे शासन आणि ग्रामस्थांमधील थेट दुवा
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद' कार्यक्रमामागील भूमिका विशद केली.शासन सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविते.या योजनांची माहिती गावपातळीवरील नागरिकांपर्यंत थेट पोहोचावी,योजनांविषयी त्यांच्या मनातील प्रश्नांचे निरसन व्हावे आणि पात्र व्यक्तींना संबंधित विभागाशी संपर्क साधून प्रत्यक्ष लाभ घेता यावा,हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
तळवडा ग्रामस्थांनी एक गाव,एक गणपतीच्या माध्यमातून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. गावातील धार्मिक- सांस्कृतिक उत्सवाला सामाजिक एकोप्याची जोड देणारा हा उपक्रम असून,या एकोप्यातून गावाच्या विकासालाही गती मिळू शकते.गणेश मंडळाच्या श्री गणेश स्थापना ठिकाणी आयोजित ‘लोकसंवाद' कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्थांनी विविध विभागांच्या योजनांची माहिती जाणून घ्यावी. माहिती घेण्यापुरते मर्यादित न राहता संबंधित शासकीय कार्यालयांशी संपर्क साधून योजनांची सविस्तर माहिती व पात्रतेचे निकष जाणून घ्यावेत आणि पात्र योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री.खडसे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करण्यात आले.यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या ‘विकास वाटा' या घडीपुस्तिकेचे उपस्थित ग्रामस्थांना वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला सरपंच ज्ञानेश्वर पांडगळे,श्री गणेश मंडळाचे अध्यक्ष सिंहल गुंड,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष इसाक शेख, ज्ञानेश्वर सरक,गणेश जाधव,बबन कोळेकर,नागेश सरक,श्रीमंत गुंड, धन्यकुमार कुलकर्णी,दिगंबर सरक,शंकर गुंड,जिंदावली सय्यद,महादेव कोळेकर,गणेश कोळेकर,अरुण गुंड,शिवाजी पाटील आणि पत्रकार अजित चंदनशिवे यांच्यासह महिला भगिनी,बाल मंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश्वर सरक यांनी केले व उपस्थितांचे आभारही मानले.
तळवडा येथील हनुमान मंदिरातील गणेश मंडळाच्या श्री गणेश स्थापना झालेल्या ठिकाणी या लोकसंवादातून महिला- बालकल्याणापासून बाल संरक्षणापर्यंत आणि कौशल्य विकासापासून रोजगार- स्वयंरोजगारापर्यंतच्या विविध योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर ग्रामस्थांना मिळाली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आलेले गाव,‘एक गाव,एक गणपती'तून दिसलेला सामाजिक एकोपा आणि त्याच व्यासपीठावर नागरिकांच्या आयुष्याशी थेट जोडलेल्या शासकीय योजनांवर झालेला संवाद यामुळे तळवड्यातील हा ‘लोकसंवाद' शासन आणि ग्रामस्थांमधील अंतर कमी करणारा उपक्रम ठरला.
