धाराशिव (प्रतिनिधी)- आदर्श प्राथमिक विद्यामंदिर, धाराशिव शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा आणि गोपीका यांची वेशभूषा केली होती. मुलींनी राधेच्या आकर्षक वेशभूषेत तर मुलांनी कृष्णाच्या वेशभूषेत लक्ष वेधून घेतले. शाळेच्या प्रांगणात दहीहंडी बांधण्यात आली होती व विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे रचून पारंपारिक पद्धतीने दहीहंडी फोडली. यावेळी 'गोविंदा आला रे आला' च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती आणि सणांचे महत्त्व रुजावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेतील सर्व शिक्षकांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
