भूम (प्रतिनिधी)-  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ भूम तालुक्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. पाथरूड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शिर्डी-हैदराबाद महामार्गावर तब्बल एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

गेल्या चार दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात मराठा समाजाच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी रस्ता रोको, निदर्शने आणि विविध प्रकारची आंदोलने केली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पाथरूड येथेही सकल मराठा समाजाने महामार्गावर उतरून आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला.

पाथरूड तसेच परिसरातील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत जोरदार घोषणाबाजी केली. आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा आणि मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रस्ता रोको आंदोलनामुळे शिर्डीहैदराबाद महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने प्रवाशांना काही काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियोजन केले.

 
Top