धाराशिव (प्रतिनिधी)-  मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांनी प्रतिकूल परिस्थितीत दाखविलेली जिद्द, त्याग आणि एकजुटीची प्रेरणा घेऊन आजच्या संभाव्य दुष्काळ व पाणीटंचाईच्या संकटावरही मात करूया, असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. संकट कितीही मोठे असू दे, सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

दि. 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री सरनाईक यांनी प्रारंभी स्मृती स्तंभास पुष्प अर्पण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली.सुरुवातीला राष्ट्रीय गीत वंदे मातरम्‌‍ झाले. पालकमंत्री सरनाईक यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ध्वजारोहणानंतर उपस्थिताना संबोधित करताना पालकमंत्री सरनाईक बोलत होते.

यावेळी स्वातंत्र्य सैनिक बुबासाहेब जाधव, भास्करराव नायगावकर, नागनाथ कुंभार, शेषराज बनसोडे,गोविंद नलावडे,नागनाथ कुंभार,मनाबाई घोडके,तात्यासाहेब शिंदे,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,पोलीस अधीक्षक रितू खोखर,जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी  विद्याचरण कडवकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्मे,स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

यावेळी पालकमंत्री सरनाईक यांनी अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेली भीषण पाणी टंचाई, त्याप्रमाणे पावसाअभावी वाळून गेलेली पीके यासाठी सरकार व प्रशासन योग्य नियोजन करत असल्याचे पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले. आधुनिक परिवहन व्यवस्था, पर्यटनातून स्थानिक रोजगाराला नवी संधी याबाबत सांगून मराठवाड्यातील माणसामध्ये जिद्द असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी केले.

 
Top