धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून येथील श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयातील कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा धगधगता इतिहास भित्तीपत्रकांच्या माध्यमातून साकारला. या विशेष ऐतिहासिक भित्तीपत्रक प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य संतोष घार्गे, कला व वाणिज्य विभाग प्रमुख कैलास कोरके, गुरुवर्य के. टी. पाटील फाउंडेशनचे शरद क्षीरसागर, पर्यवेक्षक कुमार निकम, शेषनाथ वाघ, के. पी. पाटील, संदीप जगताप आणि लक्ष्मण शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यालयाचे मराठी विभागप्रमुख तसेच 'मराठी भाषा व वाङ्मय मंडळा'चे समन्वयक प्रा. डॉ. मनोज डोलारे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण स्तुत्य उपक्रम पार पडला. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मुक्ती लढ्यातील विविध ऐतिहासिक घटना अत्यंत आकर्षक आणि प्रभावीपणे मांडल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने निजाम आणि रझाकारांनी जनतेवर केलेले अनन्वित अत्याचार, त्यांनी जाळलेली गावे व केलेले प्रचंड नुकसान, 'ऑपरेशन पोलो' म्हणजेच 'पोलीस ॲक्शन' आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा संपूर्ण घटनाक्रम रेखाटण्यात आला आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि ही उत्कृष्ट भित्तीपत्रके साकारण्यासाठी सानिया शेख, मिनाक्षी पाठक, पद्मजा वाघमोडे, प्रज्ञा खोगरे, अविनाश भिंगडे, कशिश शेख, अमृता मेंढेकर, अश्विनी शेळके, आझाद मुजावर, हर्षदा गुरव, वेदिका आघाव, श्रेया गुंड, राजेश्वरी घोडके, सानिया फुलारी, अमेर काझी, ईशिका वाघमारे, तृप्ती डोंगरे आणि सुप्रिया नरटे या विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग घेत विशेष परिश्रम घेतले. मराठवाड्याच्या ज्वलंत इतिहासाला उजाळा देणाऱ्या या उपक्रमाबद्दल प्राचार्य नंदकुमार नन्नवरे आणि उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व त्यांच्या मेहनतीचे भरभरून कौतुक केले. या उपक्रमासाठी संस्थाध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील आदींचे सहकार्य लाभले.

