तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील  मुळेवाडी व वाणेवाडी येथे एका ठिकाणी एलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला असून कृषी सहाय्यक संबंधित शेतकरी यांना या रोगाबाबत मार्गदर्शन करीत आहेत.

पिवळा मोझॅक हा सोयाबीनमधील महत्त्वाचा विषाणूजन्य रोग आहे. या रोगाचा प्रसार मुख्यतः पांढरी माशी या रसशोषक किडीमार्फत होतो.आणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. माशी अतिशय लहान, पांढऱ्या रंगाची असते. पान हलवले की माशांचा थवा उडताना दिसतो. पानांच्या खालच्या बाजूला प्रौढ माशी व पिल्ले आढळतात. पिल्ले पानाला चिकटून राहून रस शोषतात. जास्त प्रादुर्भावात पानांवर चिकट स्राव येऊ शकतो आणि त्यावर काळसर बुरशी वाढू शकते. 

रोगाचे नियंत्रण करताना रोगट झाडे काढणे  पांढऱ्या माशीचे नियंत्रण हे दोन्ही एकत्र करणे महत्त्वाचे आहे. रोगट झाडे नष्ट करणे आणि पांढऱ्या माशीविरुद्ध पिवळे चिकट सापळे वापरणे उपयुक्त आहे.

सुरुवातीला पानांवर फिकट हिरवे व पिवळे ठिपके/चट्टे दिसतात.पुढे पानांवर पिवळ्या-हिरव्या रंगाचे मोझॅकसारखे ठिपके दिसतात.रोगाची तीव्रता वाढल्यास पाने पिवळी पडून झाडाची वाढ खुंटते. लहान अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडांची वाढ मोठ्या प्रमाणात बाधित होऊ शकते. फुलधारणा व शेंगा भरण्यावर परिणाम होऊन दाण्यांचे उत्पादन कमी होऊ शकते.

रोगट झाडे त्वरित काढून नष्ट करा, शेतात पिवळा मोझॅक झालेली झाडे दिसताच ती मुळासकट उपटून शेताबाहेर नष्ट करा. रोगट झाडे शेतात ठेवली तर ती पांढऱ्या माशीला विषाणूचा स्रोत उपलब्ध करून देऊ शकतात.पांढऱ्या माशीचे निरीक्षण व नियंत्रण करण्यासाठी येलो स्टीकी ट्रिप्स लावा. शेतातील आणि बांधावरील तण वेळेवर काढून टाका. तणांवर पांढरी माशी व विषाणूचे पर्याय राहू शकतात.तरी शेताचे नियमित निरीक्षण करा.


विशेषतः पानांच्या खालच्या बाजूची पाहणी करा. पान हलवल्यावर लहान पांढऱ्या माशा उडताना दिसल्यास प्रादुर्भावाकडे गांभीर्याने पाहावे.

-धवल शिनगारे, कृषी सहाय्यक,वाणेवाडी,मुळेवाडी


 
Top