भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील चांदवड येथील सावनी रविंद्र माने हिने स्केटिंग क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे 5 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सावनीने 13 ते 15 वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर दक्षिण अमेरिकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांमधून गुणवंत स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता. त्यामुळे स्पर्धेत मोठी चुरस पाहायला मिळाली. अशा परिस्थितीत सावनीने आत्मविश्वासाने आणि उत्कृष्ट तंत्रकौशल्याच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत द्वितीय क्रमांक मिळवला. तिच्या वेगवान खेळासोबतच संतुलन, अचूकता आणि सातत्यपूर्ण सरावाचे दर्शन या स्पर्धेत घडले. सावनीने स्केटिंग क्षेत्रात यश मिळविण्यासाठी नियमित सराव, मेहनत आणि जिद्द यांना प्राधान्य दिले आहे. विविध स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होत तिने आपल्या खेळात सातत्याने सुधारणा केली. राष्ट्रीय स्पर्धेतील यश हे तिच्या या मेहनतीचे फलित मानले जात आहे. राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या या यशामुळे तिच्यासमोर आता आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्राचे दालन खुले झाले आहे.
दक्षिण अमेरिकेत होणाऱ्या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी सावनीची भारताच्या संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेल्या महाराष्ट्रातील ती एकमेव स्पर्धक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चांदवडसह भूम तालुका आणि धाराशिव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
