धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या 'मित्रा' संस्थेचे उपाध्यक्ष व तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त आमदार श्री. राणाजगजितसिंह पाटील यांच्या स्टार्टअप संकल्पनेने प्रेरित होऊन, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील फार्मसी विभागाची विद्यार्थिनी सायली साळुंके हिने 'हर्बल पेन रिलीफ पॅच' हा अभिनव प्रकल्प साकारला. या नाविन्यपूर्ण संकल्पनेची दखल डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड इंटरनशिप कार्यक्रमासाठी जुलै 2026 मध्ये झाली. त्यानुसार, विद्यापीठाच्या या विभागाच्या वतीने सायलीला तिच्या 'पॉलीहर्बल रिलीफ पॅच'चे प्रोटोटाइप सादर करण्यासाठी 3 सप्टेंबर 2026 रोजी बोलावण्यात आले होते.
या सादरीकरणाच्या प्रसंगी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या उपक्रमाला विशेष भेट देऊन सायलीच्या प्रोटोटाइपचे निरीक्षण केले. विद्यार्थिनीने आठ औषधी वनस्पती युक्त निर्मिती केलेल्या 'हर्बल पेन रिलीफ पॅच' पाहून त्याच्या संकल्पनेपासून प्रत्यक्ष प्रतिकृतीपर्यंतच्या प्रवासाने ते प्रभावित झाले. त्यांनी सायलीच्या कल्पकतेचे खुले कौतुक करत, भविष्यात अशाच आरोग्योपयोगी पॅचेसचे उत्पादन करणारे स्टार्टअप सुरू करण्यासाठी तिला आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.
'मित्रा' संस्थेचे उपाध्यक्ष व तेरणा ट्रस्टचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्याच महाविद्यालयातील सायलीच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तिचा विशेष सत्कार केला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, फार्मसी विभागाचे प्रा. डॉ. जी. बी. चिवटे व प्रा. सायली पवार आदी उपस्थित होते.
