भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील परंडा रोडवर रस्त्याच्या कडेला तसेच वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने दुचाकी वाहने उभी करणाऱ्या वाहनधारकांविरोधात भूम पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. सोमवार, दि. 7 सप्टेंबर रोजी गोलाई चौक ते भारतीय स्टेट बँकेपर्यंतच्या रस्त्यावर बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
भूम शहरातील परंडा रोड हा बाजारपेठ व विविध व्यावसायिक आस्थापनांमुळे नेहमीच वर्दळीचा असतो. या मार्गावर नागरिकांकडून वाहने कोणत्याही शिस्तीशिवाय रस्त्यावरच उभी केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी होण्याबरोबरच इतर वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकी वाहने रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त लावल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर भूम पोलिसांनी मागील दोन-तीन दिवसांपासून बेशिस्त पार्किंगविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांकडून रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांची पाहणी करून संबंधित वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच वाहन पार्क करताना वाहतुकीचे नियम पाळावेत आणि रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
