मुरूम (प्रतिनिधी)- उमरगा, लोहारा तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची मांडली व्यथा; जगदीश सुरवसे यांचे निवेदन अचलेरसह उमरगालोहारा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस आदी पिके पाण्याअभावी कोमेजून गेली आहेत. शेतकऱ्यांनी पिकांसाठी केलेला खर्च वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शासनाने तातडीने भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी अचलेर येथील रहिवासी तथा महाराष्ट्र पत्रकार संघटनेचे लोहारा तालुका उपाध्यक्ष जगदीश सुरवसे यांनी माजी मंत्री तथा आमदार आदित्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

लोहारा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे आष्टामोडलोहारा परिसरात आले असता सुरवसे यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेत्या सुषमाताई अंधारे, आमदार कैलासदादा पाटील, आमदार प्रविण स्वामी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी सुरवसे यांनी पावसाअभावी कोमेजलेल्या पिकांची अवस्था, वाढता उत्पादन खर्च आणि अपेक्षित उत्पन्नावर आलेले संकट याबाबत माहिती दिली. बियाणे, खते, औषधे, मशागत व मजुरीवर मोठा खर्च करूनही पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.


तातडीच्या मदतीसह कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, पीकविम्याचा लाभ मिळवून द्यावा तसेच शासनाच्या दुष्काळी मदतीचा लाभ पात्र शेतकऱ्यांना तत्काळ मिळावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच पाणी, रोजगार, चारा, पीकविमा, नुकसानभरपाई आणि कर्जसवलतीचे सर्वसमावेशक पॅकेज जाहीर करावे. प्रत्येक गावासाठी दीर्घकालीन जलसंधारण आराखडा तयार करून ‌‘पाणी अडवापाणी जिरवा'च्या माध्यमातून जलसाठे निर्माण करावेत. गावागावांत जलसंधारणाची कामे हाती घेऊन भविष्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. उमरगालोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नावर शासनस्तरावर तातडीने पाठपुरावा करून आवश्यक मदत मिळवून द्यावी, अशी अपेक्षा जगदीश सुरवसे यांनी व्यक्त केली.


 
Top