धाराशिव (प्रतिनिधी)-   जून-जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या.वेळेवर पेरण्या झाल्या आणि शिवारात पिकेही जोमाने उभी राहिली. मात्र,ऐन पीकवाढीच्या काळात पावसाने दीर्घ खंड दिल्याने हे आशादायी चित्र आता बदलू लागले आहे.अपेक्षित पावसाच्या तुलनेत प्रत्यक्ष पाऊस खूपच कमी झाल्याने मोठी तूट निर्माण झाली असून त्याचा गंभीर परिणाम खरीप पिकांवर दिसून येत आहे.जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीचे प्राथमिक संकेत दिसू लागल्याच्या पार्श्वभूमीवर पीक पाहणीसाठी गठित तालुकास्तरीय समित्यांनी वस्तुनिष्ठ पीक पाहणी करून त्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यासाठी विहित नमुन्यात तातडीने सादर करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 10 सप्टेंबर रोजी खरीप हंगाम-2026 च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची आढावा बैठक झाली.समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी पुजार बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप सेंगुलवार, पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त डॉ.मुळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस.कटकधोंड,वरिष्ठ भूवैज्ञानिक मांजरमकर, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चोपडे आणि कृषी विकास अधिकारी श्री.पाटील प्रत्यक्ष उपस्थित होते.सर्व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,गटविकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

जिल्हाधिकारी पुजार म्हणाले, ‌‘तालुकास्तरीय समित्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन एकत्रित निष्कर्ष आणि शिफारशींसह विविध प्रपत्रांमध्ये विहित नमुन्यात अहवाल सादर करावा. जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित करावी. दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा ठरणार असल्याने जिल्ह्यातील जलस्रोत सुरक्षित ठेवण्यावर प्रशासनाने भर द्यावा. भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी ‌‘रिचार्ज शाफ्ट'ची कामे हाती घ्यावीत असे पुजार यांनी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी पशुधन आणि उपलब्ध चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन करण्याची गरज अधोरेखित केली.  पावसाच्या दीर्घ खंडामुळे हिरवे पीक दिसत असले तरी सोयाबीनचा दाणा बारीक आहे असे कृषी शास्त्रज्ञ गुट्टे यांनी सांगितले.


 
Top