परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसासाठी मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी विशेष नमाज पठण करून पावसासाठी अल्लाहकडे प्रार्थना केली.

शहराबाहेरील हजरत ख्वाजा बद्दोदीन दर्गा परिसरातील मैदानावर शुक्रवारी दुपारी तीन वाजता हाफीज मलिक यांच्या नेतृत्वाखाली विशेष नमाज अदा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.नमाज अदा केल्यानंतर पावसासाठी विशेष दुवा करण्यात आली. “माणसांकडून काही चुका झाल्या असतील, पण मुक्या प्राण्यांनी काय केले ? त्यांच्या जीवनासाठी तरी पाऊस पडू दे,” अशी भावनिक प्रार्थना यावेळी करण्यात आली.

पावसाअभावी शेतकरी, पशुधन तसेच सर्वसामान्य नागरिक संकटात सापडले असून, लवकरात लवकर पाऊस पडावा आणि दुष्काळाचे संकट दूर व्हावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 
Top