तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती देण्यासाठी मंदिर आस्थापनेवरील दोन अनुभवी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. जयसिंग पाटील आणि नागेश शितोळे यांची सहाय्यक व्यवस्थापक (प्रशासन)पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंदिर संस्थानने नव्याने निर्माण केलेल्या पदावर कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने ही नियुक्ती केली आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी यासंदर्भातील नियुक्ती आदेश काढले आहेत. वरिष्ठ व अनुभवी कर्मचाऱ्यांमधून दोन कर्मचाऱ्यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे जयसिंग पाटील आणि नागेश शितोळे यांची सहाय्यक व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
नवीन पदाची जबाबदारी महत्त्वाची
मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कामकाजात सहाय्यक व्यवस्थापक (प्रशासन) पदाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. मंदिरातील विविध विभागांकडून येणाऱ्या संचिकांवर अभिप्राय नोंदविणे, संचिकांची छाननी करून त्या संबंधित विभागांकडे सादर करणे, तसेच प्रशासकीय स्वरूपाच्या बाबींमध्ये आवश्यक ती कार्यवाही करण्याची जबाबदारी नव्या सहाय्यक व्यवस्थापकांवर राहणार आहे. प्रशासकीय स्वरूपाची संचिका असल्यास ती व्यवस्थापक तथा तहसीलदार यांच्याकडे, तर खर्चासंदर्भातील बाबी असल्यास संबंधित संचिका लेखाधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या कामकाजातही त्यांची भूमिका राहणार आहे.
अनुभवाचा प्रशासनाला फायदा
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर दैनंदिन प्रशासकीय कामकाज चालते. भाविकांची वाढती संख्या, विविध विभागांचे कामकाज, धार्मिक कार्यक्रम, उत्सवांचे नियोजन तसेच मंदिरातील प्रशासकीय प्रक्रिया यासाठी अनुभवी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानमधीलच वरिष्ठ व अनुभवी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन सहाय्यक व्यवस्थापकपदी संधी देण्यात आल्याने त्यांच्या अनुभवाचा थेट फायदा मंदिर प्रशासनाला होणार आहे.
नवरात्रापूर्वी प्रशासनाला नवी ताकद
श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. नवरात्र काळात लाखो भाविक तुळजापुरात दाखल होत असल्याने मंदिर संस्थानच्या प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण असतो. अशा परिस्थितीत दोन सहाय्यक व्यवस्थापकांची नियुक्ती झाल्याने प्रशासकीय कामकाजाची विभागणी अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे. मंदिरातील विविध विभागांमधील संचिकांची हाताळणी, प्रशासकीय निर्णयांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याच्या प्रक्रियेला यामुळे गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निवडीचे सर्व स्तरातून स्वागत
जयसिंग पाटील आणि नागेश शितोळे यांच्या पदोन्नतीचे मंदिर संस्थानमधील कर्मचारी तसेच विविध स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. वरिष्ठता, अनुभव आणि प्रशासकीय कामकाजाची जाण लक्षात घेऊन झालेल्या या नियुक्तीमुळे मंदिर संस्थानच्या दैनंदिन प्रशासनाला अधिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनासमोरील कामांचा वाढता व्याप पाहता नव्या सहाय्यक व्यवस्थापकांवर येणारी जबाबदारीही महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे पदोन्नतीनंतर पाटील आणि शितोळे यांच्या कामकाजाकडे मंदिर प्रशासनासह भाविकांचेही लक्ष राहणार आहे.

