धाराशिव (प्रतिनिधी)- भारतात माहिती अधिकार कायदा दिनांक 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू करण्यात आला आहे, या कायद्याचा उद्देश म्हणजे शासकीय कामात पारदर्शकता आणणे आहे. या कायद्यामुळे सरकार काय काम करत आहे हे जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना मिळाला आहे तसेच हा कायदा लोकशाहीचे बळकटीकरण करण्यास उपयोगी ठरत आहे, या कायद्यामुळे शासकीय कामाची माहिती उघड होत असल्यामुळे कामकाजातील भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होत आहे, शासनाने वेळोवेळी जाणीवपूर्वक उचललेल्या पावलामुळे अल्पावधीतच राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरूपात लोकाभिमुख झाला आहे महाराष्ट्रात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याच्या व्यापक प्रसिद्धीकरिता व प्रभावी अंमलबजावणी करिता शासन स्तरावरून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत, दिनांक 28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी माहितीचा अधिकार अधिनियम या कायद्यातील तरतुदी आणि कार्यपद्धती, विविध द्रकश्राव्य माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देऊन व विविध उपक्रम राबवून त्या जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा मानस आहे यास्तव प्रतिवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात यावा असा निर्णय शासनाने घेतला आहे..

महाराष्ट्र शासनाने 20 सप्टेंबर 2008 रोजी (शासननिर्णय संगणक सांकेतांक क्रमांक-20080920155318001) निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील आदेशानुसार धाराशिव जिल्हा परिषद च्या अधीनस्थ असलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था,ग्रामपंचायती यांना अधिकृतपत्राद्वारे सूचना घेऊन 28 सप्टेंबर 2026 रोजी माहिती अधिकार दिन साजरा करून माहितीच्या अधिकाराबाबत समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याबाबत श्री प्रकाश गणपती सोनार,(सदस्य)माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन मुंबई, यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,धाराशिव तसेच गट विकास अधिकारी,पंचायत समिती,धाराशिव यांना निवेदन दिले आहे.


 
Top