तुळजापूर (प्रतिनिधी)-  बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर खर्च करून पिके उभी केली. मात्र, ऐन उत्पादनाच्या काळात पावसाने दडी मारल्याने संपूर्ण हंगामच वाया जाण्याची वेळ आली आहे. पीक काढणीचा खर्चही निघणार नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे पिकांवर रोटर फिरवण्याशिवाय पर्याय नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

मंगरूळ शहरासह नांदुरी आणि परिसरातील अन्य गावांमधील खरीप पिकांनाही पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील सुमारे 90 टक्के खरीप पिके हातातून गेली आहेत. सोयाबीन, उडीद यांसह अन्य पिकांचीही अवस्था बिकट झाली आहे. आता पाऊस झाला तरी करपलेली पिके पुन्हा उभी राहण्याची शक्यता अत्यल्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च वाया जाण्याबरोबरच पुढील हंगामाची आर्थिक तयारीही अडचणीत येणार आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करावी, नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी करण्यात येत आहे. 

 
Top